कुत्रिमरीत्या अंडी उबवून सापांच्या पिल्लांना जन्म

576

कृत्रिमरीत्या सापांची अंडी उबवून पिलांना जन्म देण्याचा प्रयोग गडचिरोली येथील सर्पमित्रांनी यशस्वीरीत्या राबविला आहे. अनुकूल वातावरणात 58 दिवस देखभाल केल्यानंतर सापाची पिले जन्माला आली आहेत. गडचिरोली येथील सर्पमित्र अजय कुकडकर यांनी 7 सप्टेंबर रोजी विश्रामगृहात ‘तस्कर’ प्रजातीच्या बिनविषारी सापास पकडले होते. काही वेळातच या सापाने 7 अंडी दिली. पावसाळ्याचे दिवस असल्याने व सर्वत्र पाणी असल्याने अंडी ठेवायची कुठे, असा प्रश्न कुकडकर यांना पडला. निर्जनस्थळी सापाला सुखरूप सोडल्यानंतर त्यांनी अंडय़ांना कृत्रिमरीत्या उबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी वनविभागाचे क्षेत्र सहायक प्रमोद जेनेकर यांच्या मदतीने सर्व अंडी एका बरणीत ठेवली.

अंडी सुरक्षित राहावी यासाठी आवश्यक वातावरणाची निर्मिती केली. त्यासाठी भंडारा येथील काही अनुभवी सर्पमित्रांचीही मदत घेतली.58 दिवसांच्या या प्रक्रियेनंतर 4 नोव्हेंबरला अंडय़ांमधून 5 पिलांनी जन्म घेतला, तर दोन अंडी खराब झाली. या पिलांना नंतर जंगलात सुखरूप सोडण्यात आले. यावेळी क्षेत्रसहायक प्रमोद जेनेकर, मनोज पिपरे, दैवत बोदेले, गणेश देवावार, सचिन जीवतोडे, होमदेव कुरवटकर, नीरज साबळे, मकसूद सय्यद, गोलु जुवारे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या