कॉलेज अभ्यासक्रमात सोशल मीडिया, गुगल सर्चिंग, योगा, बायोडाटा

308
प्रातिनिधीक फोटो

तरुण पिढी सोशल मीडियावर सक्रिय असते. गुगल सर्चिंग केल्याशिवाय तिचा दिवस पूर्ण होत नाही. बरोबरच योगा, प्राणायामबद्दलही तरुणांमध्ये आकर्षण आहे. या गोष्टींचा विचार करून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवीपूर्व शिक्षणाच्या अभ्यासक्रमातच त्यांचा समावेश केला आहे. लाइफ स्कील्स म्हणजेच ‘जीवनकौशल’ या शीर्षकाखाली हा अभ्यासक्रम बनवण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यात स्वतःचा बायोडाटा कसा लिहावा याचेही तंत्र शिकवले जाणार आहे.

यूजीसीने बनवलेला हा नवा अभ्यासक्रम देशभरात लागू होणार आहे. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि भावनिकदृष्टय़ाही सक्षम बनवणे तसेच त्यांच्यामध्ये संवादकौशल्य विकसित करणे असा त्यामागचा उद्देश आहे. लेखन आणि संवादकौशल्याबद्दल बोलायचे झाले तर आपल्याला सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सोशल मीडिया हा विद्यार्थ्यांना समाजाशी जोडण्यास उत्तम माध्यम असला तरी त्याचे फायदेतोटे यांचीही जाण विद्यार्थ्यांना असायला हवी आणि नेमके तेच या अभ्यासक्रमातून शिकवण्यात येणार आहे अशी माहिती यूजीसीच्या वरिष्ठ पदाधिकार्‍याने दिली.

सोशल मीडियावर सक्रिय असताना कोणते शिष्टाचार पाळावेत याची माहिती या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना होईल असे त्यांनी सांगितले. वैयक्तिक संबंध कसे विकसित करावेत, स्वतःची चांगली प्रतिमा समाजासमोर कशी सादर करावी, नेटवार्ंकगबरोबरच इतरांशी चर्चा, तडजोड कशी करावी जेणेकरून त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या करीयरवर पडू शकेल याचे तंत्र या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या