सोशल मीडियावर निर्बंध येणार, 15 जानेवारीपर्यंत नवीन नियम

सोशल मीडियावरून अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण करणाऱयांविरोधात आता कडक पावले उचलण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. फेसबुक, व्हाट्सऍप आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियाच्या वापरावर लवकरच निर्बंध येणार असून यासंदर्भातली नवीन नियमावली 15 जानेवारी 2020पर्यंत तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. या प्रकरणावर आता जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ात सुनावणी होणार आहे.

सोशल मीडियाचा दुरुपयोग रोखण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. सोशल मीडिया कंपन्यांच्या या याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतल्याने आता या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयातच सुनावणी होणार आहे. इंटरनेट संदर्भातील सर्व याचिकांची यादी तयार करण्याची सूचना नोंदणी अधिकाऱयांना देण्यात आली असून त्यावर एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.

दुरुपयोग रोखण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांकडे उपाययोजना नाही

आपल्या सेवांचा दुरुपयोग रोखण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांकडे काहीही उपाययोजना नाही. सोशल मीडियाच्या दुरुपयोगाची शिकार ठरलेल्यांच्या मदतीसाठी या कंपन्यांकडे कोणतीही सुविधा नाही असे ऍटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले. त्यामुळे सोशल मीडिया कंपन्यांनी कोर्टातच यायला नको होते असे ते म्हणाले. त्यावर रूम बाहेरून बंद आहे आणि कंपन्या आतून उघडा असे म्हणतायत. त्यासाठी कंपन्यांकडे चावी पाहिजे अशी उपरोधिक टिप्पणी कोर्टाने केली.

आक्षेपार्ह माहिती काढण्यासाठी सरकारी एजन्सी का नाही?

सोशल मीडिया कंपन्यांना आक्षेपार्ह माहिती काढण्यासाठी बंधनकारक करता येईल का? अशी माहिती काढून टाकण्यासाठी सरकारची एजन्सी असू नये काय? सरकारच्या जबाबदाऱया मर्यादित आहेत का? आदी प्रश्न यावेळी कोर्टाने उपस्थित केले.

आपली प्रतिक्रिया द्या