लोकशाहीचे धडे आम्हाला देऊ नका, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया कंपन्यांना सुनावले

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठीच्या नियमावलीवरून केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया कंपन्यांना लक्ष्य केले. या मुद्दय़ांवरून रविशंकर प्रसाद यांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया कंपन्यांना धारेवर धरत या कंपन्यांनी हिंदुस्थानाला लोकशाही आणि स्वातंत्र्याचे धडे देऊ नका, असे खडेबोल सुनावले. इतकेच नव्हे तर हिंदुस्थानात राहून नफा कमवायचा असेल तर संविधान आणि कायदे पाळावेच लागतील, असा सज्जड दमदेखील या कंपन्यांना भरला आहे.

सिम्बॉयसिस इंटरनॅशनल विद्यापीठाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी वरील इशारा दिला आहे. ‘सोशल मीडिया आणि सामाजिक सुरक्षा व गुन्हे’ या विषयावर ते बोलत होते. तर केंद्र सरकारने जाहीर केलेले नवे नियम हे सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात नसून त्या व्यासपीठाच्या चुकीच्या वापर करणाऱयांसाठी असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

हिंदुस्थानात निष्पक्ष पद्धतीने निवडणुका होतात. या देशात न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. मीडिया, सिव्हिल सोसायटीलाही स्वातंत्र्य आहे. मी आता या विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतोय ही खऱया अर्थाने लोकशाही असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टीका करा, प्रश्न विचारा पण कायदे पाळा

हिंदुस्थान एक डिजिटल मार्पेट आहे. त्यामुळे सोशल मीडिया कंपन्या येथे पैसे कमवितात त्याबद्दल काहीच अडचण नाही. त्यांनी पंतप्रधनांवर टीका करावी, माझ्यावर टीका करावी, प्रश्नदेखील विचारावेत, पण हिंदुस्थानातील कायदे पाळावेत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. ज्यावेळी कोणतीही हिंदुस्थानी कंपनी अमेरिकेत व्यापारासाठी जातात त्यावेळी ते तेथील कायदे आणि नियम पाळतात. त्यानुसारच या कंपन्यांनीदेखील येथील नियमांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या