बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; भाजप खासदार शिवाचार्याविरोधात कारवाई सुरू ठेवा

453

सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भाजप खासदार डॉ. शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र बोगस आढळल्याने जात पडताळणी समितीने ते रद्द करण्याचे व याप्रकरणी तहसीलदारांना त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तहसीलदारांनी आपल्या विरोधात तक्रार दाखल करू नये अशी आर्जव डॉ. शिवाचार्य यांच्या वतीने सोमवारीहायकोर्टात करण्यात आली. तहसीलदारांनी फिर्याद दाखल करून घेतली असेल तर कारवाई सुरू ठेवावी अथवा फिर्याद दाखल केली नसेल तर ती दाखल करू नये असे स्पष्ट करत सुनावणी 13 मार्चपर्यंत तहकूब केली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, बहुजन विकास आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांचा पराभव करून भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तथा नूरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरे मठ विजयी झाले होते. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लेख असून त्यांनी बेडा जंगम जातीचा बनावट दाखला तयार केला आहे असा आरोप करत अपक्ष उमेदवार व माजी महापौर प्रमोद गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली. त्यावर डॉ. शिवाचार्य यांनी जात वैधता समितीकडे अपील केले होते. जात पडताळणी समितीने डॉ. शिवाचार्य यांनी जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी दक्षता समिती नियुक्त केली. या समितीने ठिकठिकाणी जाऊन कागदपत्रांची माहिती घेतली त्यावेळी डॉ. शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आले. त्यानुसार जात पडताळणी समितीने ते रद्द केले. तसेच तहसीलदारांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या निर्णयाविरोधात डॉ. शिवाचार्य यांनी ऍड. संतोष न्हावकर यांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.शिवाचार्य यांच्या वतीने ऍड. ढाकेफाळके यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, तहसीलदारांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. हायकोर्टाने युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी 13 मार्चपर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या