103 वर्षे सेवा देणारा रेल्वेपूल इतिहास जमा, सोलापुरातील पुलाचे पाडकाम पूर्ण

सोलापुरातील 103 वर्षे सेवा दिलेला रेल्वेपूल आज कालबाह्य झाल्याने पाडण्यात आला. पाडकामासाठी रेल्वेने 12 तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. या ऐतिहासिक पुलाच्या पाडकामाची संपूर्ण सोलापूरकरांना उत्सुकता होती. त्यामुळे काहीजण सोशल मीडियावरून तर काहीजण मोबाईलवरून लाईव्ह अपडेट पाहात होते.

सोलापुरातील भैय्या चौक (अण्णा भाऊ साठे पुतळा) ते दमाणीनगरला जोडणारा 1922 साली ब्रिटिशांनी रेल्वेसाठी पूल बांधला होता. या पुलाचे बांधकाम सोलापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हाजी हजरत खान यांनी केले होते. या रेल्वेपुलाला 100 वर्षे पूर्ण झाल्याने व तो कालबाह्य झाल्याने रेल्वे विभागाने पाडण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी गेल्या 10 डिसेंबरपासून अण्णा भाऊ साठे पुतळा ते दमाणीनगर रस्ता बंद करण्यात आला आहे.

ब्रिटिशकालीन शंभर वर्षे पूर्ण केलेल्या या ऐतिहासिक पुलाचे पाडकाम हे सोलापूरकरांना मनाला चटका लावणारे ठरली आहे. यामुळे तरुणवर्ग सोशल मीडियावर अपडेट पाहात होते, तर काहीजण लाईव्हसुद्धा पाहात होते. याच ठिकाणी विस्तारीत चौपदरी 35 कोटी रुपये खर्च करून नव्याने पूल बांधण्यात येणार आहे. ब्रिटिशकालीन आणि सोलापूरची एक ओळख असलेली एक खूण आता इतिहास जमा झाली आहे.

400 कर्मचारी, अधिकाऱ्यांचा फौजफाटा

रेल्वेपुलाच्या पाडकामासाठी रेल्वेचे 200 आणि मक्तेदार कंपनीचे 150 कर्मचारी, राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाचे कर्मचारी व अधिकारी असे सुमारे 400 जणांचे पथक दिवसभर कार्यरत होते. याशिवाय 2 मोठे क्रेन, 200 टनी तीन बाहुबली क्रेन आणि गॅस कटरच्या सहाय्याने या पूलाचे पाडकाम करण्यात आले. यापुढे पुलाच्या पाडकामाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाडय़ा, दोन ते तीन तास उशिरा धावण्याची शक्यता आहे.