पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज हाच पर्याय!

अतिवृष्टीमुळे शेतशिवाराचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणे गरजेचे आहे. मदत देण्यासाठी राज्य सरकारसमोर कर्ज काढणे हाच पर्याय आहे आणि सरकारने ती भूमिका स्वीकारावी अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. अतिवृष्टीचे संकट मोठे आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन त्यावर मात करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सोलापूर व धाराशीव जिह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर सोमवारी तुळजापूर येथे शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुसळधार पावसाने पिकाबरोबर मातीही वाहून गेली आहे. सोयाबीन, कापूस, उस तसेच इतर खरीप पिके अतिवृष्टीने नेस्तनाबूत झाली आहेत. शेती व शेतकऱयावर आलेले हे संकट महाप्रचंड असून केंद्र व राज्य सरकारला समन्वयाने त्याचा मुकाबला करावा लागेल असे पवार म्हणाले.

शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यायची असेल तर कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशी सूचनाही शरद पवार यांनी केली. शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी यासाठी आपण केंद्र सरकारकडे मागणी करू असेही ते म्हणाले. मदत करताना कोणताही राजकीय अभिनिवेश असू नये असेही ते म्हणाले. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, ज्येष्ठ नेते जीवन गोरे आदींची उपस्थिती होती.

दिल्या घरी सुखी राहा

निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेले अनेकजण संपर्कात आहेत. मात्र धाराशिवमधील सोडून गेलेल्यांना परत राष्ट्रवादीत प्रवेश नाही असे सांगत शरद पवार यांनी ‘दिल्या घरी सुखी राहा’ असा टोला डॉ. पद्मसिंह पाटील व राणा जगजीतसिंह यांना मारला. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपने पाहिजे तशी दखल घेतली नाही. राजकीय निर्णय काय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे असे सूचक विधानही यावेळी शरद पवार यांनी केले.

पुन्हा कंपनी राज चालू होईल

पुठेही शेतमाल विकण्याची मुभा कृषि विधेयकाने दिल्याचे सांगितले जाते. पण माल विकलाच गेला नाही तर? मालाला किमान भाव मिळेल का? या प्रश्नांची उत्तरे कोणीच देत नाही. नेमकी हीच भीती शेतकऱयांना वाटत असल्याचे पवार म्हणाले. मंत्रिमंडळ शेतमालाची आधारभूत किंमत ठरवते. विधेयकात ही तरतूद नसल्याची तक्रार आहे. अमेझॉन, रिलायन्ससारख्या कंपन्या शेतकऱयांकडून माल घेतील. स्थानिक स्पर्धा संपवतील आणि नंतर कंपन्या म्हणतील त्या किमतीला माल विकायला भाग पाडतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही! राज्यपालांना टोला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रातील भाषा अनुचित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आत्मसन्मान असलेली व्यक्ती यानंतर त्या पदावर राहणार नाही, असा जबरदस्त टोला शरद पवार यांनी मारला. आतापर्यंत कोणत्याही राज्यपालाने असे केल्याचे आपण पाहिले नाही. खुद्द गृहमंत्र्यांनीच कानउघाडणी केल्यानंतर या पदावर राहण्याचे की नाही हे ठरवावे, असे पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या