
सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. बुधवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पडलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. विडी घरकुल, दहिटणे, शेळगी आणि अक्कलकोट रोड भागाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसरोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील जुना तुळजापूर नाका येथील नाला ओव्हरफ्लो झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. सोलापूरमध्ये गेल्या 24 तासामध्ये 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि माहिती दिली.