सोलापूर – तुळजापूर रोडवरील हॉटेल व्यवस्थापकाची हत्या; परराज्यातील आरोपी फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर – तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील एका हॉटेलच्या व्यवस्थापकाचा डोक्यात कुदळ घालून हत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. हत्या केल्यानंतर व्यवस्थापकाचा मृतदेह हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेतील झाडाखाली पुरण्यात आला होता. कैलास आप्पानाथ परबळकर ( वय 50, रा.शाहीर वस्ती भवानी पेठ,सोलापूर) असे हत्या झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. कैलास परबलकर हे हॉटेल सौरभमध्ये सात वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम करत होते. सात महिन्यापूर्वी या हॉटेलमध्ये आकाश मंडल नावाचा पश्चिम बंगाल येथील व्यक्ती वस्ताद म्हणून कामाला लागला होता. त्याने ही हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेनंतर तो फरार आहे.

महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊन झाल्यामुळे 22 मार्चपासून हॉटेल बंद होते. या काळात आकाश मंडल हा हॉटेलमध्ये एकटा राहत होता. 13 जूनपसून हॉटेलमधून पार्सल देण्याची परवानगी दिल्यानंतर हॉटेल पुन्हा सुरू झाले होते. मात्र, हॉटेलमध्ये जेवण विभाग बंद होता. फक्त मद्य आणि इतर पार्सलची सेवा सुरू होती. पार्सलची सेवा सुरू असल्यामुळे व्यवस्थापक परबलकर हॉटेलमध्ये कामाला येत होते.काही दिवसांपासून ते रात्री हॉटेलमध्येच मुक्काम करत होते. शनिवारी रात्री व्यवस्थापक कैलास परबलकर आणि वस्ताद कैलास मंडल दोघे जेवण करून झोपले होते. रविवारी सकाळी 10 वाजता साफसफाई करणारा कर्मचारी कामाला आला, तेव्हा त्याला समोरून हॉटेल बंद असल्याचे दिसून आले. त्याने हॉटेलच्या पाठीमागील बाजूस जाऊन पाहणी केली असता दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यामुळे कामगाराने हॉटेल मालक राजू गुल्लापल्ली यांना फोन करून माहिती दिली.हॉटेलमध्ये कोणी नसल्याचे समजताच गुल्लापल्ली हॉटेलमध्ये आले. सर्वत्र पाहणी केली असता एका वस्तूवर त्यांना रक्ताचे डाग दिसून आले. त्यामुळे त्यांना घातपात झाल्याचा संशय आला. त्यांनी हॉटेलच्या पाठीमागील परिसरात फिरून पाहणी केली असता त्यांना झाडाखाली प्रेत पुरल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ तालुका पोलीस ठाण्याला फोन करून या घटनेची माहिती दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल देवडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. हॉटेलचे व्यवस्थापक कैलाश परबलकर यांचा मुलगा आकाश परबळकर याला बोलावून घेतले. पुरलेले प्रेत बाहेर काढल्यानंतर मुलाने ते प्रेत वडीलांचे असल्याचे पोलिसांना सांगितले.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये परबलकर आणि मंडल हे दोघेच होते. तसेच घटनेनंतर मंडल फरार झाल्याने त्यानेच हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.