
विविध जलस्रोतातून शहराला होणारा पाणीपुरवठा आणि नागरिकांना दिले जाणारे पाणी यात मोठी विसंगती आहे. त्यामुळे शहराला होणाऱ्य़ा पाणीपुरवठ्याचा हिशेब लावण्यासाठी वॉटर ऑडिट करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे. यासाठी शंभर जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
सोलापूर शहराला उजनी धरण, औज बंधारा आणि हिप्परगा तलाव येथून पाणीपुरवठा होतो. या तीनही जलस्रोताच्या माध्यमातून दररोज जवळपास 180 एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. मात्र, शहराला चार दिवसांआड पाणीपुरवठा होतो. मिळणारे पाणी आणि नागरिकांना दिले जाणारे पाणी यात मोठी विसंगती आहे. या पाण्याचा हिशेब लागण्यासाठी वॉटर ऑडिट आवश्यक आहे. गेली अनेक वर्षे हे ऑडिट झालेले नाही. याबाबत महापालिका सभेत अनेकदा चर्चा झाली; परंतु ऑडिट झाले नव्हते. विद्यमान आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या वॉटर ऑडिटसाठी आधी ग्राहकांचा सर्व्हे करण्यात येईल. सोलापूर महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील 100 कर्मचारी शहरातील प्रत्येक मिळकतदारांच्या घरी जाऊन पाणीपुरवठ्याची तपासणी करून अहवाल देतील. मिळकत, मिळकतदार, नळ कनेक्शन, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता इत्यादीबाबतची ते माहिती घेतील.
हा सर्व्हे दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून, शहरातील नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. सोलापूर शहरातील काही मिळकतदारांनी नळकनेक्शन घेतले आहेत; परंतु त्यांना बिल मिळत नाही. तसेच ज्यांनी नळ कनेक्शनसाठी अर्ज केला आहे त्यांनीदेखील या कर्मचाऱ्य़ांकडे आपली संपूर्ण माहिती द्यावी, तरच त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येईल.
सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी वॉटर ऑडिट करण्याचे काम सध्या सुरू आहे. महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन वॉटर ऑडिट सर्व्हेसाठीची माहिती गोळा करीत आहेत. या कर्मचाऱ्य़ांना नागरिकांनी आपल्या नळ कनेक्शनबाबतची संपूर्ण खरी माहिती द्यावी. यातून शहराला पुढील 10 ते 15 वर्षांसाठी दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करता येईल. ज्यांच्या मिळकतकरावर चुकीचे बिल लागले असेल त्यांनीही अर्ज करावा. त्या अर्जांची तपासणी करून दुरुस्ती करण्यात येईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.




























































