अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याने एका नागरिकाने महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या कार्यालयासमोर ‘अर्धनग्न आंदोलन’ करीत निषेध केला. योगेश पवार असे नागरिकाचे नाव आहे.
शहरातील समस्यांबाबत गेल्या महिनाभरापासून नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते महापालिकेसमोर आंदोलन करीत आहेत. या संतापातून दोन दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांच्या गाडीवर गटारीचे घाण पाणी टाकल्याची घटना ताजी असतानाच, आज ‘अर्धनग्न आंदोलन’ करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
योगेश पवार यांनी महापालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाकडे दुकान देणे-घेण्याबाबतच्या प्रकरणाविषयी माहिती मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्जच घेण्यात आला नाही. त्यांना दोन तास ताटकळत ठेवण्यात आले. उलट तेथील अधिकारी व कर्मचाऱयांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळून योगेश पवार यांनी पालिका आवारात अंगावरील कपडे काढून पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या कार्यालयासमोर बसून निषेधाच्या घोषणा दिल्या. या घटनेने खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करत पवार यांचा अर्ज घेण्यास भाग पाडले.