श्री लक्ष्मीकृपा अर्बन निधी’मध्ये फसवणूक; 11 जणांविरुद्ध गुन्हा, आरोपींमध्ये पाच संचालक जोडप्यांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकलूज येथील श्री लक्ष्मीकृपा अर्बन निधी लिमिटेडमध्ये ठेवीदारांची 15 लाख रुपयांची फसवणूक झाली असून, याप्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये पाच संचालक जोडप्यांचा समावेश असून, या घटनेने अकलूज व इंदापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

सोमनाथ साधू खराडे, चंद्रकला सोमनाथ खराडे, आनंदराव हरिबा मगर, मनीषा आनंदराव मगर, संतोष पांडुरंग निकम, सोनाली संतोष निकम, विशाल कुमार पवार, वर्षा विशाल पवार, विलास रामधन लाखे, रेखा विलास लाखे, संग्राम शहाजी गोडसे अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत.

माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर विजयवाडी येथे राहणारा रवि तायप्पा शिंदे याने सोमनाथ साधू खराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अकलूज येथील श्री लक्ष्मीकृपा अर्बन निधी लिमिटेडमध्ये सुमारे सहा लाख साठ हजार रुपये गुंतविले होते. सुरुवातीला अर्बन निधीकडून तीन लाख 35 हजार 300 रुपये परतावा देण्यात आला. उर्वरित 3 लाख 24 हजार रुपये अद्यापही देण्यात आलेले नाहीत.

त्याचप्रमाणे काळूराम महादेव शिंदे (यशवंतनगर), राणी चंद्रकांत जाधव (हडपसर, पुणे), योगिता शिवशंकर हारके (सावंतवस्ती) यांच्याकडूनही दहा टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून संचालक मंडळाने रक्कम घेतली. यातील काही रक्कम देण्यात आली. मात्र, अद्यापही या चौघांचे 11 लाख 61 हजार 690 रुपये न दिल्याने लक्ष्मीकृपा अर्बन निधीच्या अकरा संचालकांविरुद्ध अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेल्या संचालक मंडळात पाच पती-पत्नींचा समावेश असून, या घटनेने माळशिरस तालुक्यात चर्चा रंगली आहे. सहायक पोलीस निरीक्षक टेंगळे तपास करीत आहेत.