
जुना पूना नाका ते पत्रकार भवन या ‘फेज-1’ उड्डाणपुलामध्ये बाधित होणाऱया जमिनींचे व बांधकामांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे; परंतु बाजारमूल्य निश्चित झाले नाही. येत्या ऑगस्टअखेर ‘फेज-1’ उड्डाणपुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. या मार्गातील बाधित 137 मिळकतींच्या जमिनींचे मूल्य साधारण 89 कोटी इतके आहे. जमिनी आणि इमारती अशा दोन्ही उड्डाणपुलांच्या भूसंपादनासाठी साधारण 200 कोटींची गरज आहे.
जुना पूना नाका ते पत्रकार भवन या मार्गावर उड्डाणपूल बाधित होणाऱया एकूण 137 मिळकती आहेत. या सर्व मिळकतींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोजणी होऊन मूल्यांकन पूर्ण करण्यात आले. आता नगररचना विभागाकडून अंतिम मूल्यांकन केले जात आहे. 137पैकी 117 मिळकती बाधित होणार आहेत. या 117 मिळकतींमध्ये 73 मिळकतींवर बांधकामे आहेत, तर उर्वरित खुल्या आहेत.
बाधित मिळकतींमध्ये हॉटेल, हॉस्पिटल, चाळ अशा व्यावसायिक मिळकतींची संख्या मोठी आहे. यात बांधकाम परवाना व कागदपत्रांच्या अपुऱया माहितीमुळे मूल्यांकनात अडचणी येत होत्या; परंतु संबंधित मिळकतदारांनी जागेवर नियमानुसार बांधकाम केले आहे का? याच्या तपासणीसाठी बांधकाम परवानगी आणि वीज बिल पावती आदी कागदपत्रे सादर करावीत, अशी नोटीस बजाविण्यात आली आहे. यात 137 बाधित मिळकतींच्या जागेचे बाजारमूल्य 89 कोटी इतके आहे. याशिवाय बांधकामाचे मूल्यांकन अद्यापि निश्चित करण्यात आले नाही.
दुसऱया टप्प्यात 88 मिळकती बाधित होणार
‘फेज-2’मधील जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन मार्गावर 88 मिळकती बाधित होणार आहेत. येथील बाधित मिळकतींच्या जागेची किंमत 55 कोटी इतकी आहे. यामध्ये शासकीय जमिनी अधिक असून, 49 मिळकती बाधित होणार आहेत. यात शासकीय इमारतींचे मूल्यांकन करून शासनास टीडीआर किंवा आरसीसी देण्याचा विचार महापालिकेच्या वतीने सुरू आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी भूसंपादन कार्यालयाच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे. ‘फेज-1’मधील मूल्यांकनाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित किरकोळ अडचणी दूर केले जात आहेत. दुसऱया उड्डाणपुलाचे मूल्यांकनही सुरू आहे. त्यामुळे बाधित मिळकतींच्या जमिनींचे मूल्यांकन काढण्यात आले असून, बांधकामाचे मूल्यांकन अद्यापि काढले नसल्याने भूसंपादनाची रक्कम निश्चित सांगता येणार नाही.
– पी. शिवशंकर, आयुक्त, सोलापूर महापालिका.























































