सोलापूर – अंगावर पिकअप व्हॅन घालून पोलिसाचा खून

940

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील विजयपूर महामार्गावर वडकबाळ येथे लावण्यात आलेल्या नाकाबंदीतील पोलीस शिपायाच्या अंगावर पिकअप व्हॅन घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंद्रुप पोलिसांनी पीकअप चालकास अटक केली आहे.

रामेश्वर गंगाधर परचंडे (वय 30, रा. जोडभावी पेठ, सोलापूर) असे खून झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.त्यांची नेमणूक सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी वडकबाळ येथे जिल्हाबंदीसाठी नाकाबंदी लावली आहे. या ठिकाणी 22 मे रोजी पहाटे 4 वाजता पोलीस शिपाई परचंडे हे पोलीस नाईक लक्ष्मण कोळेकर, होमगार्ड स्वप्नील गिरी, दिनेश रास्ते यांच्यासह नाकाबंदी करीत होते. पावणेपाच वाजता तेरामैलकडून सोलापूरकडे निघालेली एक पिकअप व्हॅन भरधाव वेगाने तिथे आली. पोलीस नाईक कोळेकर यांनी इशारा करूनही चालकाने पिकअप व्हॅन थांबविली नाही. पिकअपच्या पाठीमागे फळ्या लावलेल्या होत्या व नंबरप्लेट खोडलेली होती. संशय आल्याने पोलीस शिपाई परचंडे व होमगार्ड रास्ते यांनी मोटरसायकलवरून पिकअपचा पाठलाग केला. पोलीस येत आहेत, असे पाहून चालकाने पीकअप समशापूर ते नंदूर रस्त्याने घेतली. महामागार्पासून 200 मीटर अंतरावर परचंडे यांनी पाठलाग करून पिकअप व्हॅन अडवली.

चालकाने पिकअप थांबविल्याचे पाहून परचंडे मोटरसायकलवरून खाली उतरून चालकाकडे जात असताना चालकाने पिकअप वेगाने दामटली. यात पिकअपचा धक्का बसून परचंडे खाली पडले व चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. होमगार्ड रास्ते यांनी ही माहिती दिल्यावर नाईक कोळेकर घटनास्थळी आले व त्यांनी सपोनि धांडे यांना ही माहिती दिली. धांडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन खाजगी वाहनातून परचंडे यांना सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

याप्रकरणी पोलीस नाईक कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गौस नबीलाल कुरेशी (वय 31, रा. बाशापेठ, सोलापूर) याच्याविरूद्ध खून करण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच चालक गौस याला अटक केली आहे. उपचार सुरू असताना परचंडे हे शनिवारी पहाटे मरण पावले. त्यामुळे आता चालक गौस याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी हवालदार शिंदे यांनी सांगितले.

विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट
या प्रकरणाची माहिती देताच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुहास वारके यांनी वडकबाळ नाकाबंदी व मंद्रुप पोलीस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या