आंबेकर शूटिंगबॉल स्पर्धेवर सोलापूर संघाचे वर्चस्व

कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत सोलापूर जिल्हा युथ फाऊंडेशन संघाने पुण्याच्या कावेरी नगर संघाचा 21-10 असा सहज पराभव करीत अजिंक्यपद संपादले. राज्यभरातून 26 संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता.

उपांत्य फेरीच्या सामन्यात कावेरी नगर संघाने संजय भोसले प्रतिष्ठानचा 21-11 तर सोलापूर जिल्हा संघाने खानापूर जिह्याचा 21-15 असा पराभव करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. विजयी संघ जोरदार असले तरी अंतिम सामना एकतर्फी झाला. प्रेक्षकांना थरारक सामन्याची अपेक्षा होती, पण कावेरी नगर संघाने निराशा केली. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, सुनील बोरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. स्पर्धेचे उद्घाटन शूटिंगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्याम सावंत, सरचिटणीस दीपक सावंत आणि युनियन उपाध्यक्ष माजी नगरसेवक सुनील अहिर यांच्या हस्ते पार पडले. विजेत्या संघाला आंबेकर चषकासह 11 हजार रुपयांचे रोख इनाम देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट खेळाडूचा मान दस्तगीर आणि जयंत खंडागळे यांना देण्यात आला.