
सोलापूर शहरातील महावितरणच्या ‘क’ उपविभागामध्ये आज (दि. 11 मे) मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीचे कामे करत असताना दोन वीज कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. यामध्ये महावितरणच्या वीज कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
सोलापुरात वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचे कामे बुधवारी केली जातात. रामलाल चौक शाखे अंतर्गत आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास वरिष्ठ तंत्रज्ञ शेख रब्बानी अहमद (वय अंदाजे 37 वर्षे) व कंत्राटी कर्मचारी अझहर चाँद तांबोळी (वय अंदाजे 22 वर्षे) हे दोघे सिव्हील वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या 11 के.व्ही. रामलाल चौक फिडरवर रेल्वे स्टेशन परिसरातील एका ठिकाणी विजेच्या तारांना लागणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम करत होते. याकरिता त्यांनी महावितरणच्या शिडीगाडीची मदत घेतली होती. तरीही काम करताना अचानक लागलेल्या शॉकमुळे ते जखमी झाले आहेत.
या दोन्ही कर्मचाऱ्यांना तातडीने अश्विनी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, दोघांपैकी शेख रब्बानी अहमद यांची प्रकृती गंभीर आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला, वीज पुरवठा बंद केल्याची खातरमजा या दोघांनी केली होती की नाही याची माहिती समजली नाही. विद्युत निरीक्षकाच्या अहवालानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

























































