
सोलापूरसह तीन जिल्ह्यांची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने अवघ्या महिनाभरात वजा साठ टक्क्यांवरून अधिक साठ टक्क्यांवर मजल मारली आहे. भीमा खोऱ्यात सुरू असलेला दमदार पावसामुळे उजनीत मोठ्या प्रमाणात पाणी दाखल होत आहे. उजनीत सध्या 95 टीएमसी पाणीसाठा असून, उजनी अधिक 62 टक्क्यांवर आले आहे.
जूनमध्ये उजनी वजा साठ टक्क्यांवर गेले होते. मात्र, मान्सूनपूर्वीच भीमा खोऱ्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उजनीत पाणीसाठा वाढण्यात मदत होत होती. त्यातच उजनीच्या वरील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी उजनीत जमा होत आहे. जूनमध्ये उजनीत अवघे 31 टीएमसी पाणी होते. आजस्थितीला 95 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. वाढलेल्या विसर्गामुळे उजनीत अवघ्या 10 दिवसांत 64 टीएमसी पाणी आल्याने सोलापूरकरांची चिंता मिटली आहे. उजनी धरणाची क्षमता 117 टीएमसी असली तरी 123 टीएमसीपर्यंत पाणी साठवू शकतो. सध्या उजनीत दौंड येथून 42 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत उजनी पूर्ण क्षमतेने भरेल, असा अंदाज आहे.