सोलापूरात विवाह समारंभासाठी 100 जणांना परवानगी, महानगरपालिका आयुक्तांचा नवा आदेश

सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली असून, शहरातील वातावरण व व्यवहार पूर्वपदावर येत असताना पालिका आयुक्तांनी नवा आदेश काढून शहरवासीयांनी दिलासा दिला आहे. सोमवारपासून शहरातील विवाह समारंभाला 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अंत्यसंस्काराच्या वेळी होणाऱया गर्दीवरील निर्बंधही हटविण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागासाठी आज सुधारित आदेश काढला असून, यात फारशा सवलती देण्यात आलेल्या नाहीत.

सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली असून, बरे होऊन घरी जाणाऱया रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी 6 जून रोजी आदेश काढून शहरात सर्व व्यवहार सुरू करण्यास काही अटींवर परवानगी दिली होती. या अटीत दुरुस्ती करून रविवारी शहरवासीयांना दिलासा देणारा नवा आदेश काढला आहे.

यात रेस्टॉरंट, मॉल्स, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, सार्वजनिक जागा मैदाने, जिम, बांधकाम क्षेत्र, कृषी क्षेत्र, ई-सेवा पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहेत. बसेस, खासगी वाहन, इतर राज्यांत जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांनाही परवानगी दिली आहे. शिवाय विवाह समारंभात 100 जणांची उपस्थिती, कार्यालयातील कर्मचाऱयांची 100 टक्के उपस्थिती व अंत्यसंस्कारासाठी असलेल्या गर्दीवरील निर्बंध हटविले आहेत.

जिह्यात कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र

सोलापूर शहर व जिह्यात कोरोनाची लाट ओसरली असून, शहरातील 26 पैकी 5 प्रभागांत अवघे सहा रुग्ण आढळले आहेत. मृत्यूचा दरही कमालीचा घटला आहे. बाधितांपेक्षा कोरोनाचे बरे होऊन जाणाऱया रुग्णांची संख्या अधिक आहे. शहरात सध्या 184 रुग्णांवर उपचार सुरू आहे. ग्रामीण भागातील ही अशीच स्थिती आढळत आहे. जिह्यातील 11 तालुक्यांपैकी मंगळवेढा – 1, उत्तर सोलापूर – 7, दक्षिण सोलापूर – 4 या तीन तालुक्यांत अवघे बारा रुग्ण आढळले आहेत. करमाळा, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, पंढरपूर, दक्षिण सोलापूर या पाच तालुक्यांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

प्रत्येक तालुक्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होऊन जाणाऱयांची संख्या मोठी आहे. जिह्यात आज म्युकरमायकोसिसची 21 नवीन रुग्ण आढळले आहेत. 12 जण बरे होऊन गेले आहेत. एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 440 रुग्ण आढळले असून, 183 जणांवर उपचार सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या