Women’s Day सोलापूरच्या आधुनिक बहिणाबाई, जेमतेम दुसरी शिकलेल्या विमल माळींनी रचल्या 600 कविता

फक्त इयत्ता दुसरीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि तरीही जीवनाचं काव्य मांडणाऱ्या सोलापूरच्या विमल माळी ‘आधुनिक बहिणाबाई’ म्हणून ओळखल्या जातात. डोक्यावर पदर, कपाळावर आडवं कुंकू, साधी राहणी असलेल्या विमल माळी जेव्हा गावरान शैलीत स्वरचित कविता म्हणतात, तेव्हा सारेच अवाक होतात. त्यांच्या कवितांमध्ये शेतकरी, दुष्काळ, पाऊस, गावाकडच्या स्त्रीया असतात. एक-एक शब्द जोडत त्यांनी आतापर्यंत सहाशेहून अधिक कविता केल्या आहेत.

विमल माळी सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यात अनगर गावात राहतात. त्या 65 वर्षांच्या आहेत. शेती हे त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन. घरात काम करताना, शेतात राबताना, गुरांना चारापाणी करताना त्यांना कविता सुचते. मग कुणाला तरी त्या कविता कागदावर उतरायला सांगतात. त्यांच्या अनेक कवितांना काळ्या मातीचा गंध असतो. त्या म्हणतात, घरचे सगळे शिकलेले. मी शाळेत जात नव्हते. बागेत, शेतात लपायचे. मला निसर्ग आवडायचा. आजही मी निसर्गात रममाण होते.

विमल माळी यांचा ‘हुंकार काळ्या आईचा’ हा काव्यसंग्रह लोकसहभागातून प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक साहित्य संमेलनांमध्ये आपल्या कविता सादर केल्या आहेत. त्यांनी रचलेल्या बहुतांश कविता त्यांना तोंडपाठ आहेत. त्यांनी सुमारे 45 महाविद्यालयांमध्ये कथा-कवितेतून मुलांचे प्रबोधन केले आहे.

वडिलांच्या निधनानंतर पहिली कविता

विमल यांचे वडील वारकरी संप्रदायातील होते. त्यामुळे घरात लहानपणापासूनच कीर्तन, अभंग, ओव्या याचे वातावरण होते. वडील पंढरपूरची वारी करायचे, ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे, विमलताई ते सगळं मनापासून ऐकायच्या. वडिलांसोबत कीर्तन, भजनाच्या कार्यक्रमात जायच्या. वडिलांचे निधन झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्यावर एकटी पंढरपूरला जाण्याची वेळ आली, तेव्हा वडिलांच्या आठवणीने त्यांच्या तोंडून शब्द बाहेर आले.

ओढ पंढरीची मला होई घाई,

आता कशाला जाऊ 

तिथे जन्मदाता दिसेल का बाई?’

ही माझ्या कवितेची खरी सुरुवात होती, असे विमलताईंनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले. वयाच्या 15 व्या वर्षी लग्न होऊन सासरी आल्यानंतर त्यांनी काव्य करण्याचा छंद सोडला नाही. त्यांचे पती परशुराम माळी यांनी त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले.

निसर्ग राजा पूर्ण भाळला, सृष्टीदेवी वरी

राहून राहून कशा पैकितो एकांताच्या सरी

 जरा निळसर पदर ओढुनि, डोंगर माथ्यावरी

फिरू लागले जळ मोकळे हिरव्या शालूवरी

रम्य निसर्गी रमले गमले हिरव्या रानामधी,

येतो भेटीला मेघ सृष्टीला आभाळातून कधी.

उगीच त्याची वाट पाहते होऊन वेडी मनी,

जरा लागता चाहूल त्याची लपते कोपीमधी.’

विमल माळी सांगतात, मतदानाचा टक्का वाढवा, लेक वाचवा, पाणी जपून वापरा, प्रदूषण नियंत्रण अशा अनेक विषयांवर मी संदेश देत असते. मी अल्प भूधारक शेतकरी आहे. मला कुठलेही मानधन नाही. त्यामुळे सरकारी अनुदान मिळावं ही अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या