दिवसभर उन्हाचा तडाखा, सायंकाळी रिमझीम पाऊस, सोलापूरकरांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा तडाखा असून, तापमान उच्चांकी 44.3 अंश सेल्सिअसवर गेलेला होता. गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावत दिलासा दिला आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल पाच अंश सेल्सिअसने घट झाली असून, 39.1 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आज नोंद झाली आहे. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात उन्हाचा तडाखा असतानाच गुरुवारी तापमानात घट झाली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास सर्वत्र ढगाळ वातावरण होते. सातच्या सुमारास अचानकपणे अर्धातास पाऊस कोसळला. दरम्यान, सर्वत्र वाराही असल्याने काही आल्हाददायक वातावरण तयार झाले होते. मोठय़ा पावसाची अपेक्षा असताना काही काळ रिमझिम पाऊस पडला. त्यामुळे अपेक्षाभंग झाला. अचानकपणे पावसाच्या सरी कोसळू लागल्याने बाजारपेठेत ग्राहकांची धांदल उडाली होती. आज तापमानाची नोंद 39.1 अंश इतकी झाली असून, अधूनमधून पडणारा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील कुरनुर, चपळगाव,  सांगवी बु.सह वागदरी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले असून, झाडांचे आंबे गळून पडले आहेत.