संजीवनी धुरी-जाधव,[email protected]
लडाखमध्ये जगातील मोठा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होत आहे… आपल्या महाराष्ट्रात ही भविष्यकालीन अक्षय्य गुंतवणूक कधी होईल..?
लडाखमध्ये जगातील सगळ्यात मोठा सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने सौरऊर्जा विषयाचे संशोधन प्रा. सुधीर पानसे यांच्याशी संवाद साधला असता त्यांचे म्हणणे आहे, सौरऊर्जा भविष्यात आपल्याला तारणार आहे आणि सौरऊर्जाच आपले भविष्य आहे.
लडाखमधील सौरऊर्जा प्रकल्पाविषयी प्रा. सुधीर पानसे यांना विचारले असता त्यांचे म्हणणे आहे की, लडाख हा सर्वात उत्तम सौरऊर्जा असलेला हिंदुस्थानातला प्रदेश आहे. जसं राजस्थानच्या वाळवंटात आहे तितकाच किंवा त्याहीपेक्षा जास्त प्रखर सूर्यप्रकाश हा लडाखमध्ये मिळतो आणि अधिक काळ मिळतो. त्यामुळे तिथे अशा प्रकारचा ऊर्जा प्रकल्प करण्याची कल्पना ही योग्यच आहे. एकच गोष्ट आहे की, लडाखचा हा प्रदेश आहे तो जिथे वस्ती आहे, उद्योगधंदे आहेत, जिथे विजेला मागणी आहे अशा सगळ्या विभागापासून प्रकल्प फार दूर आहे. त्यामुळे तिथे विद्युत ऊर्जा तयार केली तरी त्याची वाहतूक करावी लागेल. त्यासाठीचा जो खर्च असेल किंवा त्याच्यात जे नुकसान होणार असेल त्याचाही विचार करणे आवश्यक आहे. अर्थात त्याचा विचार केला असेलच. लडाखच्या बाबतीतला हाच प्रश्न आहे की ते तसे लांब आहे खूप आणि तिथून ती ऊर्जा तयार करून आणायची याच्यासाठी बऱयापैकी खर्च करावा लागेल. दुसरं म्हणजे तिथे बर्फ पडत राहतो आणि त्यामुळे त्या हवामानात तीव्र बदल होत राहतात. त्याचा परिणाम ते सोलर पॅनल असतील किंवा बाकी जे काही आहे त्याच्यावर काय होईल हा दुसरा एक महत्त्वाचा विचार करणे आवश्यक आहे. परंतु या दिशेने आपण जी काही पावले टाकू ते सर्व काही आवश्यकच आहे. कारण आपल्याला ऊर्जेची गरज आहे आणि सौरऊर्जा हेच भविष्य आहे. पण ते करताना अनेक गोष्टींचा विचार करून त्याचा निर्णय घ्यावा लागतो.
महाराष्ट्रात सौरऊर्जेचे किमान नऊ महिन्यांचे भांडार असते, शहराशहरात-गावागावात असे प्रकल्प उभारण्यासाठी काय करावे लागेल, असे त्यांना विचारले असता ते सांगतात, पॅनल्सच्या सहाय्याने वीज तयार करण्याचे प्रकल्प आपल्याकडे पण चालू झालेले आहेत, त्यासाठी गुंतवणुकीचा मुद्दा आहे. परंतु अनेक ठिकाणी आज सौरऊर्जेवरती विद्युत प्रकल्प तयार केलेले आहेत. मात्र फोटो होल्टाईट पॅनल आहेत ते वापरून सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करताना मुख्य प्रश्न हा साठवणुकीचा आहे आणि पूर्वी असे होते की, पॅनल आणि त्याला इलेक्ट्रिक बॅटरी असायची जशी कारमध्ये असते तशी. त्याच्यात ती ऊर्जा साठवून ठेवायची आणि नंतर वापरायची. ती बॅटरी खूप महाग पडते. त्याचे आयुष्य कमी असते. त्यामुळे बॅटरीच्या सहाय्याने ते होत नाही. आता सौरऊर्जेची विद्युत ऊर्जा तयार होते ती आपल्या ग्रीडला देतात. औष्णिक विद्युत केंद्रातून किंवा जलविद्युत केंद्रातून जी काही वीज मुंबई शहरात येत असते त्याला ग्रीड म्हणतात. त्या ग्रीडला घराच्या छपरावर पॅनल बसवले तर असे तंत्रज्ञान आहे की, ती वीज त्या ग्रीडला जोडता येते. मग पाहिजे तेव्हा ती वीज वापरा. नको तेव्हा ती ग्रीडला पाठवा आणि जेव्हा तुमची वीज तयार होत नाही तेव्हा ग्रीडमधून वीज घ्या आणि त्या सगळ्याचा आपोआप हिशोब होऊन तुमचं बिल कमी-जास्त होतं, असे तंत्रज्ञान आहे. पण ग्रीडमध्ये किती टक्के आपण वीज पाठवणार. कारण मुख्य जिथून सगळं येतं ते त्या जलविद्युत केंद्रातून किंवा औष्णिक विद्युत केंद्रातून. त्यामुळे त्याच्यात किती टक्क्यांनी ही सौरऊर्जा देता येईल याला एक मर्यादा आहे. त्या मर्यादेच्या जवळ आपण पोहोचलो आहोत. या सगळ्या प्रकल्पांमध्ये आज ना उद्या अडथळा निर्माण होईल हे उघड आहे. त्यामुळे औष्णिक विद्युत प्रकल्प सौरऊर्जेच्या सहाय्याने हे सगळ्या गोष्टीवर मात करतील, असे सध्याचे तंत्रज्ञान सांगते. औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रात नाहीत. जे आहेत ते सगळे पॅनल्स लावलेले आहेत.
सौरऊर्जेचा वापर उद्योगधंद्यांसाठी होऊ शकतो
आताचे जे तंत्रज्ञान आहे त्यासाठी मोकळी जागा असणे आवश्यक आहे, फार तर तुमच्या गच्चीवर प्रकल्प करता येईल. पण खरं तर खूप इमारती, लहान लहान घरे असल्यामुळे त्यातली ऊर्जा आहे ती इतक्या लोकांमध्ये विभागली गेल्यावर त्याचा फार थोडा उपयोग होतो. सौरऊर्जेवर चालणारे कुकर वापरायचे असले तर त्यासाठी पुरेसे ऊन येणारी जागा असावी लागते. जिथे मोकळी जागा आहे अशा ठिकाणी ऊर्जा बनवता येते. सौरऊर्जेचा आणखी एक चांगला उपयोग म्हणजे आपण फक्त विजेसाठी कसा उपयोग होईल हे बघतो. सौरऊर्जेचा वापर हा छोटे मोठे उद्योगधंद्यांसाठी होऊ शकतो, फूड इंडस्ट्रीसाठी होऊ शकतो. सरकारही प्रोत्साहन देण्यासाठी योजना गेली कित्येक वर्षे राबवतंय. पण अजून आपल्याला पाहिजे तेवढय़ा प्रमाणात झालेला नाही. छोटय़ामोठय़ा उद्योगधंद्यांसाठी झाला तर त्याचा खूप उपयोग होईल. वाहनांसाठी सौरऊर्जेचा वापर करता यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण अजूनपर्यंत त्याचे यश फार मर्यादित आहे.
सौरऊर्जेवरती विविध प्रकारचे काम सुरू
सौरऊर्जेवरती विविध प्रकारचे प्रयत्न आपल्याकडे होत आहेत. याबाबत आयआयटीमध्ये काम सुरू आहे. जोधपूरला एक मोठं सोलर पार्क बनवले आहे आणि तिथे तंत्रज्ञानाचे काम सुरू आहे. मुंबई विज्ञान परिषदेनेसुद्धा संशोधन पद्धतीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या प्रश्नांवर काम सुरू आहे. पण नेत्रदीपक यश त्याला आलेले नाही आहे. मात्र भविष्यात सौरऊर्जा तारणार आहे याबाबत काहीच शंका नाही.
























































