इडली चहात बुडवून खाणे पाप…सोशल मीडियावर उडवली खिल्ली!

975

सध्या पाककलेमध्ये नवनवीन पदार्थ करण्याचा ट्रेंड रुजत आहे. काहीजण दोन वेगवेगळे पदार्थ एकत्र करून त्याची चव चाखत आहे. मात्र, असे प्रयोग करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रकार एकाला चांगलाच महागात पडला आहे. त्याने दोन वेगळे पदार्थ एकत्र करून त्याची चव चाखली आणि यावर तुमची प्रतिक्रिया काय, अशी विचारणा सोशल मीडियावर केली. त्याला आलेल्या प्रतिक्रियांमुळे त्याचा हा प्रयोग अंगलट आला आहे.

काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती दूधात मॅगी बनवूत खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. आता नुकताच एका व्यक्तीने इडली चहात बुडवून खाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि त्यावर युजरला प्रतिक्रिया विचारल्या. अनेकांना त्याचा हा प्रयोग रुचला नाही आणि त्यांनी सोशल मीडियावरच त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. इडलीसारख्या पदार्थ चहात बुडवून खाणे पाप असल्याची एक गमंतीदार प्रतिक्रियाही एका यूजरने दिली आहे.

आपण हिंदुस्थानात नवीन आहोत. या देशातील खानपानाच्या पद्धती आपल्याला माहित नाहीत. त्यामुळे मला आवडेल तसे कॉम्बिनेशन करून हा पदार्थ मी टेस्ट करत आहे. तुम्हाला हा प्रयोग कसा वाटतो, ते मला कळवा असे त्याने व्हिडीओ व्हायरल करताना म्हटले होते. आठ सेकंदांच्या या व्हिडिओत तो व्यक्ती इडलीचा एक तुकडा तोडून चहाच्या कपात बुडवून तो बिस्कीटासारखा खात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांना त्याचा हा प्रयोग रुचला नाही आणि त्यांची यथेच्छ खिल्ली उडवण्यास यूजरने सुरुवात केली. काहीजणांनी इडलीसारखा पदार्थ चहामध्ये बुडवून खाणे पाप असल्याचे सांगत, त्याची फिरकी घेतली आहे. तर काहीजणांनी खानपानाच्या सवयी शिकण्याचा सल्लाही त्याला दिला आहे. खाण्याची गोष्ट आधी खावी, त्यानंतर ज्यूस, चहा, सरबत घ्यावे, असे काहींनी त्याला समजावले आहे. तुम्ही जो पदार्थ खात आहात, तो इडली असून दक्षिण हिंदुस्थानातील लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. ते बिस्कीट, टोस्ट किंवा पाव नाही, त्यामुळे ते चहात बुडवून खाणे योग्य नसल्याचा सल्लाही त्याला दिला आहे. तर काहींनी तुम्ही केलेला प्रकार भयंकर आहे. तुम्हाला पोटदुखीचा त्रास सुरू होण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे सांगत त्याची टेर खेचली आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या या प्रतिक्रियांमुळे हा प्रयोग सोशल मीडियावर शेअर करणे त्या व्यक्तीच्या अंगलट आले आहे.

काही दिवसांपूर्वी चंदीगडच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांचे वेगळे फ्यूजन खवैय्यांसाठी सादर करण्यात आले होते. त्यात दाल मखनी कॅपेचिनो कॉफी, गुलाबजामुन वडापाव, डोसा मसाला बर्गर यासारखे वेगवेगळ्या खाद्यपदार्थ्यांचे फ्यूजन सादर करण्यात आले होते. काही लोकांना हा नवा प्रयोग खूप आवडला. तर काहींनी त्याच्यावर मिम्स बनवत त्याची खिल्ली उडवली. पंचतारांकित हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ एकत्र झाल्याने हे नवीन फ्यूजन निर्माण झाल्याचे एका यूजरने म्हटले होते. मात्र, इडली चहात बुडवून खाणे हे पाप, ही प्रतिक्रिया खूप व्हायरल होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या