लहान मुलांसोबत दणक्यात लाँच झाला सोनी मराठीचा सुपर डान्सर शो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सोनी मराठी या वाहिनीवर लवकरच छोट्या उस्तांदांसाठी डान्सचा कार्यक्रम सुरू होणार आहे. नुकताच हा कार्यक्रम सोनी मराठीने दणक्यात लाँच केला. कमला मिलमधील स्मॅश गेमिंग सेंटरमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी वाहिनीने बऱ्याच लहान मुलांना देखील कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे या मुलांच्या मजामस्तीमध्ये दणक्यात शोचे लाँचिंग करण्यात आले.

हिंदीतील सोनी वाहिनीवर गाजलेला सुपर डान्सर हा शो १५ ऑक्टोबरपासून सोनी मराठीवर सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लहान मुलांना संधी देण्यात येणार आहे. या रिअॅलिटी शोमध्ये मुलांना जज करण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सतीश राजवाडे, अभिनेत्री अमृता खानविलकर, कोरिओग्राफर विठ्ठल पाटील ही तज्ज्ञ मंडळी असणार आहेत. या शोच्या निमित्ताने सतीश राजवाडे पहिल्यांदाच रिअॅलिटी शोचा भाग होणार आहेत. या शोचे सुत्रसंचालन फास्टर फेणे फेम अमेय वाघ करणार आहे.

सोनी मराठीच्या या नव्या कार्यक्रमाविषयी बोलताना सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भालवणकर यांनी सांगितले, ‘सोनी मराठीने कायम वेगळ्या धाटणीचे कार्यक्रम तयार केले आहेत. या कार्यक्रमातही आम्ही मुलांमधील टॅलेंटला अधिक वाव मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही सतिश राजवाडे, विठ्ठल पाटील, अमृता खानविलकर अशी सुपर टॅलेंटेज जजेसचे त्रिकूट आणले आहे. आमच्या या वेगळेपणामुळेच लोकांची आम्हाला पसंती मिळत आहे.’