दिवाळी-ईद-ख्रिसमस नाही, गुढी पाडव्याला प्रदर्शित होणार ‘सूर्यवंशी’

1267

बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपट आणि साजरे होणारे सण यांचं एक खास नातं आहे. सणवारांना जोडून येणाऱ्या सुट्ट्या, सगळीकडे असलेलं उत्साहाचं वातावरण यांच्या जोडीने बॉलिवूडकर चित्रपट प्रदर्शित करतात. अर्थात हे नातं जितकं व्यावसायिक असतं तितकचं ते अनेक कलाकारांसाठी जिव्हाळ्याचं किंवा श्रद्धेचं असतं. उदाहरणार्थ सलमान खान हा त्याचे चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित करतो तर आमीर खान त्याचे चित्रपट ख्रिसमसच्या दिवशी किंवा आठवड्यात प्रदर्शित करतो.

पोलिसांच्या आयुष्यावरचे सिंघम, सिम्बा असे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टीने यंदा त्याच्या सूर्यवंशी या चित्रपटासाठी मात्र गुढी पाडव्याचा मुहूर्त निवडला आहे. सूर्यवंशी हा चित्रपट 2020 मध्ये ईदला प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सलमान खानचे हल्लीचे सगळे चित्रपट ईदला प्रदर्शित होतात. त्यामुळे सलमान खानचे चाहते रोहित शेट्टी आणि अक्षय कुमारवर संतापले होते. कारण बॉक्स ऑफीसवर सूर्यवंशी आणि सलमानच्या चित्रपटात संघर्ष झाला असता. पण, रोहितने हा चित्रपट गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित करण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या दिवशी सायंकाळी सहापासून ते पुढे 24 तास या चित्रपटाचे शो ठेवण्यात आले आहेत.

रोहित शेट्टीचा मराठी भाषेशी आणि मराठी भाषिकांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध वेळोवेळी दिसून आला आहे. त्याच्या चित्रपटात बहुतांश वेळा मराठी कलाकार झळकतात. रोहित शेट्टीने आत्तापर्यंत जे पोलीस अधिकारी दाखवले आहेत त्यांची आडनावे मराठी आहेत. त्याचा आगामी चित्रपट सूर्यवंशी देखील त्याला अपवाद नाहीये. बाजीराव सिंघम, संग्राम भालेराव आणि आता रोहित शेट्टीने वीर सूर्यवंशी हा अधिकारी सूर्यवंशीमध्ये दाखवण्याचं ठरवलं आहे. सूर्यवंशी या चित्रपटाचा ट्रेलर 2 मार्च रोजी प्रदर्शित होणार असून हा चित्रपट येत्या 24 मार्च 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या