
गेल्या सहा दशकांत आपल्या नैसर्गिक अभिनयाने 300 हून अधिक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारणारे बंगाली कलाविश्वातील दिग्गज अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे आज निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. गेल्या महिनाभरापासून येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
सौमित्र चॅटर्जी यांना कोरोनामुळे 5 ऑक्टोबरला रुग्णालयात दाखल केले होते. 15 ऑक्टोबरला त्यांनी कोरोनावर मात केली होती. परंतु इतर आजारांमुळे त्यांची प्रपृती अधिकच खालावली. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवले होते. अखेर उपचारादरम्यान आज दुपारी 12.15 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
फ्रान्स सरकारने घेतली दखल
दमदार अभिनयाच्या जोरावर सौमित्र यांनी विविध पुरस्कारांवर नाव कोरले होते. फ्रान्स सरकारच्यावतीने देण्यात येणारा ‘ऑर्ड्रे देस आर्ट्स एट देस लेट्रेस’ हा पुरस्कार पटकावणारे ते पहिले हिंदुस्थानी अभिनेते होते. याशिवाय हिंदुस्थानी सिनेक्षेत्रातील सर्वेच्च दादासाहेब फाळके पुरस्कार, दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 7 वेळा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी पटकावला होता. 2004 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
सत्यजित रे यांच्यासोबत 14 सिनेमांत काम
सौमित्र चॅटर्जी यांनी 1959 मध्ये ’अपूर संसार’ या चित्रपटातून करियरची सुरूवात केली. 1959 ते 2020 या कालावधीत त्यांनी असंख्य बंगाली चित्रपटांमधून दर्जेदार भूमिका साकारल्या. ऑस्कर विजेते दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या चित्रपटातील भूमिकांसाठी ते विशेषकरून ओळखले जायचे.























































