जमिनीतून हिरा मिळाल्याची खबर उडाली आणि गावकऱ्यांनी डोंगर खोदला! खोदकामात सापडला….

कधी कधी गुप्तधन किंवा मौल्यवान धातू-रत्न इत्यादी खोदकामात सापडल्याची माहिती मिळाली की अनेक लोक तिथे विचार न करता धावतात. बरेचदा त्यांच्या हाती काहीतरी वस्तू लागते तर कधी भलतंच काहीतरी सापडतं. अशीच एक घटना दक्षिण आफ्रिकेतील एका गावात घडली आहे.

या गावाचं नाव क्वाजुलु-नताल असं आहे. या गावाजवळ असलेल्या एका डोंगरात त्यांच्या ग्रामस्थांपैकी एकाला चमकदार दगड सापडला. तो दगड एखाद्या हिऱ्याप्रमाणे वाटल्याने त्याने ही माहिती गावकऱ्यांना सांगितली. झालं.. ही माहिती खरी आहे का, याची शहानिशा न करता सगळा गाव हिऱ्याच्या शोधात डोंगराच्या दिशेने धावला.

गावातले लोक कुदळ, पहार, फावडं घेऊन खोदू लागले. हिरा मिळाला तर फायदा होईल असं त्यांना वाटलं. त्यामुळे ते खोदकाम करत राहिले. ही माहिती सरकारला मिळाली तेव्हा सरकारने भूवैज्ञानिक आणि खाणकाम तज्ज्ञांना तिथे पाठवलं. त्यांनी या गावकऱ्यांशी संपर्क साधला.

तोपर्यंत गावकऱ्यांपैकी काहींना खडीसाखरेप्रमाणे दिसणारे स्फटिक मिळाले होते. त्या खड्यांची पडताळणी केली तेव्हा ते हिरे नसल्याचं लक्षात आलं. ते खडे क्वार्ट्ज क्रिस्टल्स होते. हा एक कमी दर्जाचा मौल्यवान दगड आहे. पण, त्याची किंमत हिऱ्यांहून खूप कमी आहे.

आपल्याला सापडलेले खडे हे हिरे नाहीत, याचं गावकऱ्यांना अपार दुःख झालं. मात्र, त्यातही काहींनी आशा सोडली नसून ते अद्यापही खोदकाम करत आहेत. कारण, या डोंगर परिसरात खाणी असून या खाणीत याआधी हिरे सापडले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या