दक्षिण आफ्रिकेची बरोबरी, पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय

यजमान दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाने सोमवारी रात्री पाकिस्तानला 6 गडी व 36 चेंडू राखून धूळ चारली आणि चार सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवणाऱया तसेच नाबाद 20 धावांची खेळी साकारत दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱया जॉर्ज लिंडे याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

पाकिस्तानकडून मिळालेल्या 141 धावांचा पाठलाग करणाऱया दक्षिण आफ्रिकेने चार गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. सलामीवीर एडन मार्करमने 30 चेंडूंत तीन षटकार व सात चौकारांसह 54 धावांची दमदार खेळी साकारली. कर्णधार हेनरीच क्लासेन याने नाबाद 36 धावा करताना दक्षिण आफ्रिकेसाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली.

दरम्यान, याआधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कर्णधार बाबर आझमच्या 50 धावा व मोहम्मद हाफीजच्या 32 धावा वगळता कोणालाही चमकदार फलंदाजी करता आली नाही. पाकिस्तानला 20 षटकांमध्ये 9 बाद 140 धावाच करता आल्या. जॉर्ज लिंडेने 23 धावा देत तीन फलंदाजांना बाद केले. लिझाद विल्यम्सने 35 धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

आपली प्रतिक्रिया द्या