दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा (खो-खो); हिंदुस्थानचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

427

दक्षिण आशियाई स्पर्धा काठमांडू-पोखरा, नेपाळ येथे सुरू असून या क्रीडा महोत्सवातील खो-खो स्पर्धेतील लढती काठमांडू येथे खेळवण्यात येत आहेत. यजमान हिंदुस्थानच्या दोन्ही संघांनी (पुरुष, महिला) जबरदस्त खेळ करताना श्रीलंका, नेपाळ व बांगलादेशला पराभूत करून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला. याप्रसंगी सलग दुसऱया सुवर्ण पदकाकडे वाटचाल सुरू असल्याचे पुरुष संघाचा कर्णधार बाळासाहेब पोकार्डेने सांगितले.

सुपर लीग पद्धतीने झालेल्या पुरुषांच्या सामन्यात हिंदुस्थानने नेपाळवर 17-05 असा एक डाव 12 गुणांनी धमाकेदार विजय साजरा केला. या सामन्यात दीपक माधवने संरक्षण करताना तीन मिनिटे तीस सेकंद पळतीचा खेळ केला व आक्रमणात तीन गडी बाद केले, तपन पालने संरक्षण करताना तीन मिनिटे पळतीचा खेळ केला व आक्रमणात दोन खेळाडू बाद केले. तसेच सागर पोद्दार व अक्षय गणपुलेने संरक्षण करताना प्रत्येकी तीन-तीन मिनिटांचा पळतीचा खेळ करून हिंदुस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. नेपाळच्या बुद्धकुमार थापाने व मिलन रायने चांगला खेळ केला. मात्र ते आपल्या संघाला मोठय़ा पराभवापासून वाचू शकले नाहीत. महिलांच्या सुपर लीग पद्धतीने झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने नेपाळवर 11-03 असा एक डाव आठ गुणांनी मोठा विजय साजरा केला.

आपली प्रतिक्रिया द्या