उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या नेत्याची निर्घृण हत्या, भाजप नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा

राजकीय वादातून भाजप नगरसेवकाने समाजवादी पक्षाच्या नेत्याची घरात घुसून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. ओमप्रकाश सिंह असे हत्या झालेल्या सपा नेत्याचं नाव आहे. शुक्रवारी रात्री परसापूर शहरातील राजा टोला येथील घरात घुसून ओमप्रकाश यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी भाजप नगरसेवकासह त्याच्या तीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, उदयभान सिंग उर्फ ​​लल्लन सिंग असे आरोपी भाजप नगरसेवकाचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. ओमप्रकाश सिंग यांनी लल्लन सिंग विरोधात नगर पंचायत निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत ओमप्रकाश यांचा पराभव झाला होता.

लल्लन सिंग आणि त्याच्या तीन मुलांनी याआधीही दोन वेळा आपल्या पतीवर हल्ले केल्याचे ओमप्रकाश यांची पत्नी नीलम यांनी सांगितले. याबाबत आपण पोलिसात तक्रारही दिली होती. मात्र राजकीय दबावामुळे आरोपींवर कारवाई झाली नाही. यामुळेच आरोपींचा धीर चेपला आणि त्यांनी आपल्या पतीची हत्या केल्याचे नीलम यांनी नमूद केले.

घटना उघडकीस येताच सपाचे ज्येष्ठ नेते योगेश प्रताप सिंह, माजी आमदार बैजनाथ दुबे आणि इतर पक्षाचे नेते ओमप्रकाश यांच्या घरी धाव घेतली. सिंह यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठा जमाव जमला होता. आरोपींवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी यावेळी जमावाने आणि नेत्यांनी केली.

दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक (पश्चिम) राधेश्याम राय आणि कर्नलगंज पोलीस सर्कल अधिकारी चंद्रपाल शर्मा यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आंदोलकांना त्वरित कारवाईचे आश्वासन देत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सिंह यांची पत्नी नीलम यांच्या तक्रारीच्या आधारे, पारसपूर नगर पंचायतीचे भाजप नगरसेवक उदयभान सिंग उर्फ ​​लल्लन सिंग आणि त्यांच्या तीन मुलांसह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असे पारसपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी दिनेश सिंह यांनी सांगितले.