
हवामान बदल आणि पर्यावरण संकटावर उपाय शोधण्यासाठी महाराष्ट्रातील 45 तरुण एकत्र आले आणि भविष्यासाठी कृती करण्याचा निर्धार केला. मुंबईत झालेल्या या विशेष चर्चासत्रात युवकांनी पूरस्थिती, तापमानवाढ, तीव्र हवामान घटना,
जैवविविधतेची हानी, शहरीकरण, पाण्याचा अपव्यय अशा गंभीर विषयांवर चर्चा केली. चर्चेतून मिळालेल्या शिफारसी आणि चर्चेचे मुद्दे नोव्हेंबरला ब्राझीलमध्ये होणाऱया कॉप 30 परिषदेत भारतीय युवा प्रतिनिधित्वाचा भाग म्हणून सादर केले जाणार आहेत.
इंडियन यूथ क्लायमेट नेटवर्कने (आयवायसीएन) युनिसेफ इंडिया, सात्त्विक सोल फाउंडेशन (एसएसएफ), ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्न्मेंट (एआयआयएलएसजी मुंबई), अॅग्रो रेंजर्स, एनएसएस, प्रत्येक (नाईन इज माईन प्लॅटफॉर्म), माझी वसुंधरा आणि महाराष्ट्र राज्य हवामान कृती कक्ष यांच्या सहकार्याने ‘लोकल कॉन्फरन्स ऑफ यूथ इंडिया 2025 सिटी कन्सल्टेशन सिरीज’चे आयोजन अंधेरी येथे केले होते. या माध्यमातून भारतातील तरुणांच्या अपेक्षा आणि पर्यावरण संवर्धनासाठी त्यांचे योगदान स्पष्ट करणारा कृतीसंदेश जागतिक स्तरावर दिला जाईल. कॉप 30 म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल कराराच्या (यूएनएफसीसीसी) पक्षांची 30 वी परिषद आहे.


























































