तरुण पिढीच्या डिजिटल व्यसनाला आळा घालण्यासाठी टास्क फोर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहान मुलांमधील वाढत्या डिजिटल व्यसनामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती राज्याचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांनी आज दिली.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 29 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात तरुण आणि अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया व्यसनाचे वाढते धोके अधोरेखित करण्यात आले आहेत. या अहवालात मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर वयोमर्यादा ठरविणे, तसेच अल्पवयीनांना डोळ्यासमोर ठेवून केलेल्या डिजिटल जाहिरातींवर निर्बंध आणण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर शेलार यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव वीरेंद्र सिंह यांना तज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करण्याबाबत लेखी निर्देश दिले आहेत. आर्थिक पाहणी अहवालातील शिफारशी आणि तज्ञांनी मांडलेल्या पुराव्यांच्या आधारे राज्यासाठी संतुलित तसेच माहितीपूर्ण धोरण ठरविण्यासाठी विभागाने या विषयाचा सखोल अभ्यास करावा. त्यासाठी आवश्यक असल्यास सर्वांगीण अभ्यासासाठी तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करावा, असे निर्देश शेलार यांनी दिले आहेत.

टास्क फोर्समध्ये कोण?

टास्क फोर्समध्ये शिक्षणतज्ञ, मानसोपचारतज्ञ, बालसमुपदेशक, तंत्रज्ञान तज्ञ, व्यवस्थापन तज्ञ, डॉक्टर, कायदेतज्ञ तसेच संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी यांचा समावेश असेल.