नाशिक – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्षेत्रनिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती

362

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी महसूल, जिल्हा परिषद, आरोग्य, सार्वजनिक बांधकामसह विविध विभागातील अधिकाऩयांची क्षेत्रनिहाय नेमणूक केली आहे. कोरोनाचा प्रसार नियंत्रित करणे, पॅथोलॉजी लॅब तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे व्यवस्थापन, जनआरोग्य योजनेची अंमलबजावणी हे काम त्यांच्यावर सोपवले आहे.

आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी व मृत्यूंचे विश्लेषण करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्यावर असेल. नाशिक व मालेगांव महापालिका क्षेत्र वगळून संपूर्ण जिह्यातील समन्वय व संनियंत्रण डॉ. उदय बर्वे हे पार पाडतील. सर्व पॅथोलॉजी लॅबचे व्यवस्थापन डॉ. उत्कर्ष दुधेडिया बघतील. जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयक डॉ. तुषार मोरे व डॉ. कपिल आहेर असतील.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संपूर्ण जबाबदारीजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे व संबंधित गटविकास अधिकारीपाहतील. प्रभावी सर्वेक्षण, विलगीकरणातील रुग्णांची निगराणी आणि अतिसंवेदनशील रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) अरविंद अंतुर्लीकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्रिस्तरीय पद्धतीतील रुग्णालयांना आवश्यक साहित्य पुरवठा करण्याकडे डॉ. कपिल आहेर लक्ष देतील, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी काढले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या