मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा वेग वाढवा, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्देश

मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचे आदेश सप्टेंबर 2025 मध्ये जारी करण्यात आले आहेत. मराठवाडा महसूल विभागातील आठही जिह्यांत प्रमाणपत्रांसाठी मोठ्या प्रमाणत अर्ज प्राप्त होत आहेत. हे अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा वेग वाढवा, असे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले.

मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, माजी न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व मराठवाडय़ातील आठही जिह्यांचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

मराठा आरक्षण उपसमिती तसेच माजी न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून मराठा कुणबी जात दाखले व वैधता प्रमाणपत्र वितरणातील अडथळे दूर करावेत. यासाठी गावपातळीपर्यंत जाऊन शासकीय यंत्रणेने सक्रियपणे प्रयत्न करावेत, असे निर्देश विखे-पाटील यांनी दिले.

दाखले वितरणाचा वेग वाढविण्यासाठी माजी न्यायमूर्ती शिंदे यांनी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती उपयुक्त ठरणार असून, ते मराठवाडा विभागातील विविध जिह्यांना भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत. सप्टेंबर 2025 नंतर प्राप्त अर्ज व वितरित दाखल्यांचे प्रमाण सध्या कमी असून, ते वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री विखे-पाटील म्हणाले.

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅझेट लागू होणार?

मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनानंतर हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आले. पण सातारा गॅझेटियर कधी लागू होणार? असा प्रश्न मराठा बांधवांना पडला आहे. साताऱयासह पश्चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांना याचा फायदा होणार असल्याने या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅझेट लागू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार मंत्रालय स्तरावर आढावा घेण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.