नागपूर पाठोपाठ आता मुंबईतही अपघातांची मालिका काही केल्या थांबायच नावच घेत नाहीत. वरळी हिट अॅड रन प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा भरधाव कारमुळे झालेल्या अपघातानं मुंबई हादरली आहे. वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना आलिशान कारनं चिरडल्याची घटना सोमवारी घडली. या अपघातात एका चा मृत्य़ू झाला असून एकजण जखमी झाला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
निखिल जावटे (34) आणि शुभम डोंगरे (33) अशी आरोपींची नावं आहेत. तर गणेश यादव (36) असे या मृत व्यक्तीचे नाव असून बबलू श्रीवास्तव हे त्याच्या जखमी मित्राचे नाव आहे. गणेश यादव हे रिक्षाचालक होते. गणेश आणि बबलू अंधेरी-वर्सोवा समुद्रकिनारी झोपले असता एका भरधाव कारने त्यांना चिरडल. या अपघातात गणेश यादवचा मृत्यू झाला तर बबलू श्रीवास्तव गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडल-
रिक्षाचालक गणेश यादव हा वर्सोवातील सागर कुटीर येथे राहत होता. रविवारी रात्री गणेश आणि त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव हे अंधेरी-वर्सोवा बीचवर झोपण्यासाठी म्हणून गेले होते. दरम्यान सोमवारी पहाटे 5 च्या सुमारास MH 32 FE-3033 या क्रमांकाच्या एसयूव्ही कारने समुद्रकिनाऱ्यावर साखर झोपेत असलेल्या गणेश ला चिरडलं. त्यामुळे त्याचा जागीतच मृत्यू झाला. तर बबूल श्रीवास्तव हा गंभीर जखमी झाला आहे.
अपघात होताच कारचालकाने गाडी थांबवून गणेशकडे धाव घेतली. य़ावेळी त्याला जागवण्याचा निखिल आणि शुभमने प्रयत्न केलाय मात्र त्यानं कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर लगेचच दोघेजण कार घेऊन तिथून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली. तसेच वर्सोवा पोलिसांनी विविध कलमांखाली आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान तेथे उपस्थित एका रहिवाशाने त्याच्या मोबाईलवर वाहनाच्या नंबर प्लेटचा फोटो काढला होता. त्यामुळे वर्सोवा पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास मदत झाली. त्यामुळे पोलिसांनी अवघ्या तीन तासाच आरोपीचा शोध लावून त्यांना नागपूरमधून अटक केली. दरम्यान आरोपींना मंगळवारी अंधेरी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच आरोपींनी मद्यसेवन केल्याबाबत शहानिशा करण्यासाठी रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.