
हिंदुस्थानात फक्त एकाच व्यक्तीला सध्याच्या घडीला SPG सुरक्षा कवच देण्यात आलेले आहे. ही व्यक्ती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्या सुरक्षेसाठी दिवसाला 1.62 कोटी रुपये खर्च येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. DMK पक्षाचे खासदार दयानिधी मारन यांनी संसदेमध्ये एसपीजी आणि सीआरपीएफची सुरक्षा कोणा-कोणाला मिळते आहे? अशा आशयाचा प्रश्न विचारला होता. मंगळवारी म्हणजेच 11 फेब्रुवारीला 2020 ला केंद्रीय गृहराज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले. रेड्डी यांनी त्यांच्या लेखी उत्तरात नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाहीये, मात्र ही सुरक्षा देशात फक्त एकाच व्यक्तीला देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात म्हटलंय की एकूण 56 लोकांच्या सुरक्षेसाठी CRPF चे जवान तैनात करण्यात आलेले आहे. मात्र या व्यक्तिंच्या सुरक्षेच्या कारण देत त्यांनी नावे उघड करण्यात आली नाहीत. एसपीजी तुकडीसाठी अर्थसंकल्पामध्ये 2020-2021 या वर्षासाठी 592.55 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात यासाठी 540.16 कोटींची तरतूद करण्यात आली होती. गेल्या वर्षी हे सुरक्षा कवच सोनिया गांधी , राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही प्रदान करण्यात आले होते जे आता काढून घेण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील एसपीजी सुरक्षा कवचाचा आढावा घेतला आणि चार व्यक्तिंना मिळणाऱ्या सुरक्षेवरून आकडेमोड केली तर एका व्यक्तिच्या सुरक्षेसाठी 135 कोटी रुपये खर्च येत होता. सध्याच्या घडीला या सुरक्षा कवचासाठी आता 592 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरले आहे. या हिशोबाने आता या सुरक्षा कवचासाठी दिवसाला 1.62 कोटी रुपये, तासाला 6 लाख 75 हजार आणि एका मिनिटाला 11,263 रुपये खर्च येणार आहे.

























































