
पुन्हा एकदा दक्षिण मध्य मुंबई क्रीडा रंगात न्हाऊन निघणार आहे. खिलाडूवृत्तीला नवा उत्साह देण्यासाठी शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकारातून 15 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान भव्य ‘खेळ महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी अभूतपूर्व आयोजन यश लाभल्यामुळे यंदाही हा महोत्सव अधिक व्यापक, अधिक उत्साहवर्धक आणि अधिक जोशात पार पडणार आहे.
चेंबूरमधील गांधी मैदान, महादेव वाडी येथे शनिवार, 15 नोव्हेंबरला सायं. 6 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मैदानात तयारी जोरात सुरू असून आयोजकांनी स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद अपेक्षित असल्याचे सांगितले. या खेळ महोत्सवात खो-खो, मल्लखांब, रस्सीखेच, महिला आणि पुरुष क्रिकेट स्पर्धा, टेबल टेनिस, कुस्ती, फुटबॉल, बुद्धिबळ, कॅरम अशा अनेक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. गतवर्षी हजारोंच्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यंदा त्याहून अधिक गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.
खेळातून जिद्द आणि नवी ऊर्जा मिळते
खेळामुळे जिंकण्याची वृत्ती, संघभावना आणि आत्मविश्वास वाढतो. मुला-मुलींच्या खिलाडूवृत्तीला वाव मिळावा, नव्या पिढीला पुढे येण्यासाठी संधी मिळावी म्हणून हा महोत्सव आयोजित केल्याचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.
दक्षिण मध्य मुंबई आणि खेळाडूही सज्ज
या महोत्सवामुळे परिसरातील क्रीडासंस्कृतीला नवी चालना मिळेल. खेळाचा स्पिरिट, स्पर्धेची मजा आणि प्रतिभेला वाव हे तिन्ही घटक एकाच मंचावर अनुभवायला मिळणार आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील सर्व स्पर्धकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
























































