लॉकडाऊनची अफवा पसरवणे हा देशद्रोह! इंधनाचा अजिबात तुटवडा नाही – देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गॅस एजन्सी आणि पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या असताना, ‘राज्यात इंधनाचा अजिबात तुटवडा नाही. एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा आहे’, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. लॉकडाऊन लागणार, इंधन व गॅस पुरवठा खंडित होणार अशा खोट्या बातम्या पसरवणारे देशद्रोह करत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगल्या प्रकारे हे संकट हाताळल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून इंधन आणि गॅस पुरवठ्याचा आढावा घेतला. मोदींच्या धोरणात्मक नियोजनामुळे कुठेच पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस टंचाई नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. अनेक देशांमध्ये इंधन संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही देशांनी कामाचे दिवस कमी करून चार दिवसांचा आठवडा केला आहे, तर काही ठिकाणी सक्तीचे ‘वर्क फ्रॉम होम’ लागू केले आहे. मात्र, हिंदुस्थानात सरकारने अशी परिस्थिती उद्भवू दिली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढूनही केंद्र सरकारने त्याचा भार स्वतः उचलल्याने सर्वसामान्यांना त्याची झळ बसली नाही, असे फडणवीस म्हणाले.