श्रीलंका आणि न्यूझीलंड या उभय संघांमध्ये पार पडलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने जिंकून श्रीलंकाने इतिहास रचला आहे. तब्बल 15 वर्षांनी श्रीलंकाने न्यूझीलंडचा कसोटी मालिकेत पराभव केला आहे. त्यामुळे श्रीलंकाने WTC च्या गुणतालिकेत आपली जागा मजबूत करत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची झोप उडवली आहे.
श्रीलंकाने घरच्या मैदानावर खेळताना न्यूझीलंडला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाणी पाजलं. पहिल्या सामन्यात श्रीलंकाने न्यूझीलंडचा 63 धावांनी पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि 154 धावांच्या मोठ्या फरकाने न्यूझीलंडला पराभवाची धुळ चारली. या ऐतिहासिक मालिका विजयामुळे श्रीलंकाने WTC गुणतालिकेत 55.55 गुणांची कमाई करत तिसरे स्थान पटकावले आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र आता मालिकेत पराभव पत्करावा लागल्यामुळे न्यूझीलंडचा संघ थेट सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
श्रीलंकाने न्यूझीलंडचा सुपडा साफ केल्यामुळे त्यांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची संधी निर्माण झाली आहे. श्रीलंका आता इथून पुढे चार कसोटी सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्द दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन. जर श्रीलंकाने सर्व सामने जिंकले तर त्यांचे गुण 69.23 होतील. मात्र त्यानंतर हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारी बॉर्डर गावसकर ट्रॉफी महत्वाची ठरणार आहे.
जर टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश दिला आणि श्रीलंकेने त्यांचे चारही सामने जिंकले किंवा ड्रॉ केले, तर त्यांना WTC चा अंतिम सामना खेळण्याची संधी निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट होऊ शकतो. असे असले तरी टीम इंडियाचे अंतिम फेरीत पोहचणे जवळपास निश्चित आहे.
टीम इंडियाने आता पर्यंत 10 कसोटी सामने खेळले असून त्यांनी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे आणि दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे टीम इंडिया 71.67 गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 62.50 गुणांसह ऑस्ट्रेलिया स्थानबद्ध आहे.