शनाकाच्या तडाख्याने ओमानचा चुराडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्णधार दासुन शनाकाच्या स्फोटक अर्धशतकासह पुसल मेंडिस आणि पवन रत्नायकेच्या धडाकेबाज खेळीमुळे श्रीलंकेने ओमानचा 105 धावांनी धुव्वा उडवत टी 20 विश्वचषकात सुपर एटच्या दिशेने झेप घेतली. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने पाच बाद 225 धावांचा प्रचंड डोंगर उभा केला आणि त्यानंतर ओमानला 120 धावांत गारद करत 105 धावांच्या मोठय़ा विजयाची नोंद केली. या विजयामुळे लंका ‘ब’ गटात अव्वल स्थानी पोहोचली आहे.

आघाडीचे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यावर पुसल मेंडिस आणि पवन रत्नायकेने ओमानच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. दोघांनी वैयक्तिक अर्धशतकेही झळकवली. 23 वर्षीय रत्नायकेने 28 चेंडूंवर 60 धावांची आतषबाजी करत टी 20 आंतरराष्ट्रीयमधील पहिले अर्धशतक झळकवले. दोघांनी 52 चेंडूंवर 94 धावांची भागीदारी रचून ओमानी गोलंदाजांना सैरभैर केले. मग शेवटी शनाकाने केवळ 19 चेंडूंवर अर्धशतक पूर्ण करत श्रीलंकेसाठी विश्वचषकातील नवा विक्रम केला. अखेरच्या चार षटकांत 65 धावा काढत त्यांनी स्पर्धेतील आतापर्यंतचा 225 हा सर्वोच्च स्कोर उभारला.

ओमान 226 धावांचे आव्हान पाहूनच हादरला होता. त्यामुळे त्यांची सुरुवातही खराबच झाली. दुष्मंत चमीरा आणि महीश तीक्ष्णाने सुरुवातीला ओमानवर घाव घालत पॉवरप्लेमध्ये 3 बाद  36 अशी वाट लावली. ओमानच्या मोहम्मद नदीमने नाबाद 52 धावांची झुंज दिली, पण ते विजयाच्या जवळपासही पोहचू शकले नाही. नदीमला वसीम अली (27) वगळता एकाचीही साथ लाभली नाही. ओमानचा दारुण पराभव आधीच निश्चित झाला होता, पण नदीमने श्रीलंकेला आपला डाव गुंडाळू दिला नाही. त्यांनी 20 षटकांत 8 बाद 120 धावा केल्या.