दक्षिण आफ्रिकेच्या झंझावाताला रोखण्यासाठी श्रीलंका सज्ज

एकापेक्षा एक धडाकेबाज आणि झंझावाती फलंदाज असलेल्या दक्षिण आफ्रिकेला रोखण्यासाठी श्रीलंका आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीसह सज्ज आहे. टी-20 वर्ल्ड कपचा ‘ड’ गट हा डेथ ग्रुप असून पाच संघांपैकी दोन संघांना गटातून सुपर-एटमध्ये स्थान मिळवण्यासाठी अथक संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे विजयाच्या बोहणीसाठी दोघेही तयार आहेत. कोण यशस्वी ठरतो ते रात्री कळेलच.

अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरू झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अनेक संघ कमकुवत आहेत. मात्र आता दुसऱयाच दिवशी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघांमध्ये लढत होतेय. हा एकमेव असा गट आहे, ज्यात तीन कसोटी संघ आहेत आणि दोन संघ लिंबू-टिंबू संघांचे दादा. त्यामुळे या गटात धक्कादायक निकालांची अपेक्षा आहे.

अत्यंत अवघड असलेल्या गटात विजयी सलामी देऊन सुपर- एटसाठी आपले स्थान बळकट करण्याचे सर्वांचेच प्रयत्न असतील. या गटातील सर्वात बलाढय संघ म्हणून दक्षिण आफ्रिका सर्वात पुढे आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये हेन्रीक क्लासन, कर्णधार एडन मार्करम, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर आणि क्विंटन डिकॉक यांचे आक्रमण अवघ्या जगाने पाहिलेय. यांना एकाच वेळी रोखण्यासाठी श्रीलंकन गोलंदाजांना आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. वानिंदु हसरंगाच्या नेतृत्वाखाली लंकेची फिरकी अधिक प्रभावी झालीच आहे. त्यासोबत मथिश पथिराणा, दिलशान मदुशंका आणि महीश तीक्षणा यांची गोलंदाजी लंकेची खरी ताकद आहे.

आफ्रिकन गोलंदाजही सुरात आहेत. पॅगिसो रबाडा त्यांच्या गोलंदाजीची तळपती तलवार असली तर एन्रीक नॉर्किया, तबरेस शम्सी, माकाx यान्सन आणि केशव महाराज यांच्यामुळे गोलंदाजी अधिक धारदार झाली आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या तुलनेत दक्षिण आफ्रिका बलशाली आहे आणि तेच विजय मिळवतील, याबाबत तीळमात्र शंका नाही. मात्र हा वेगवान खेळ एका षटकात सरडय़ासारखा रंग बदलतो. त्यामुळे विजयाचे पारडे लंकेच्या बाजूने झुकवायला एक प्रभावी षटकही पुरेसे ठरू शकते.

आफ्रिकाच बलवान

उभय संघात कोणत्याही दृष्टीने दक्षिण आफ्रिकेचाच संघ बलवान आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 17 सामने झाले असून आफ्रिकेने 12 जिंकलेत आणि श्रीलंकेला केवळ 5 सामन्यांत विजय खेचून आणण्यात यश लाभलेय. त्यामुळे हा बलवान संघ न्यूयॉर्कच्या नव्याकोऱया स्टेडियमवर विजयाचा श्रीगणेशा करण्याचीच अधिक शक्यता आहे.