सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाने पत्नीची केली हत्या, स्वत:वर वार करत आत्महत्येचा प्रयत्न

1340
प्रातिनिधिक फोटो

पेठरोडच्या इंद्रप्रस्थनगरीत लष्करी जवानाने किरकोळ वादातून पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने चाकूने वार करून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मूळ सटाणा तालुक्यातील भांद्रीपाडा येथील लष्करी जवान सुनील श्रीधर बावा (30) हा श्रीनगर येथे कार्यरत असून, सध्या दहा दिवसांच्या सुट्टीवर पेठरोडच्या इंद्रप्रस्थनगरी येथील घरी आला होता. तो व पत्नी चैताली (23) यांच्यात बुधवारी संध्याकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यांचा आवाज ऐकून घराजवळ राहणारी चैतालीची मावशी व काका घरी पोहचले. मात्र, सुनील दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी सिडकोत राहणारे चैतालीचे वडील प्रकाश विक्रम बावा यांना कळवले. ते म्हसरूळ पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता चैतालीचा गळा आवळून खून झाल्याचे, सुनीलनेही हातावर चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे लक्षात आले. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुनील व चैतालीचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून, त्यांना अडीच महिन्यांची मुलगी आहे. माहेरून पैसे आणण्यासाठी सुनील वारंवार चैतालीचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता. त्यानेच चैतालीची हत्या केल्याची फिर्याद प्रकाश बावा यांनी गुरुवारी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंदविली, त्यावरून सुनीलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या