श्रीनिवास पाटील यांचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मान; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा 19 वा स्थापना दिन उत्साहात

प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणाऱया लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झालेल्या कसबा बावडय़ात यशवंतराव पाटील यांनी शाळा सुरू केली. त्यानंतर त्यांचे पुत्र डी. वाय. पाटील यांनी सुरू केलेल्या उच्च शिक्षण देणाऱया संस्थेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठास नॅककडून ‘ए प्लस प्लस’ हे सर्वोत्तम नामांकन मिळणे हे अभिमानास्पद असून, हे विद्यापीठ भविष्यात जागतिक पातळीवर नावलौकिक करेल, असा विश्वास माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या 19व्या स्थापना दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी श्रीनिवास पाटील यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीला पुनर्परीक्षणात नॅक चे ‘ए प्लस प्लस’ मानांकन मिळाल्यानंतर त्याच्या लोगोचे अनावरण यावेळी करण्यात आले, तर कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, रजिस्ट्रार व्ही. बी. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीनिवास पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासोबतच्या साठ वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. छत्रपती शाहू महाराजांचा शैक्षणिक धोरणाचा वारसा यशवंतराव पाटील व डी. वाय. पाटील यांनी चालवला. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. डी. वाय. पाटील यांनी लावलेल्या रोपटय़ाचे वटवृक्षात रूपांतर करून, त्यावर गुणवत्तेचे तोरण बांधण्याचे काम डॉ. संजय पाटील, सतेज पाटील व पुढील पिढी करीत आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, ‘विद्यापीठाला नॅकचे सर्वोच्च मानांकन मिळाल्याने देशातील 23वे व राज्यातील पाचवे विद्यापीठ बनण्याचा मान मिळाला. आता ऑनलाइन कोर्सेस, संशोधनावर भर देऊन जागतिक विद्यापीठांच्या यादीमध्ये स्थान मिळविण्याचा आमचा प्रयत्न राहील.’