दहावीच्या निकालात ‘कोकणकन्या’ सुस्साट

सामना प्रतिनिधी । मुंबई

आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात १०० नंबरी यशाचा ‘लातूर पॅटर्न’ समोर आला आहे. परीक्षाकाळात कॉपींचा सुळसुळाट असलेल्या लातूर आणि संभाजीनगर विभागातील सर्वाधिक विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल ८९.४१ टक्के लागला असून ‘कोकणची बाजी; मुलींची सरशी’ कायम आहे. कोकणचा निकाल सर्वाधिक ९६ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ८५.९७ टक्के लागला असून ९०.४१ टक्क्यांसह मुंबई विभागाने राज्याच्या निकालातील चौथे स्थान कायम राखले आहे.

कला-क्रीडा कोटा, कॉपी आणि १०० टक्के हा योगायोग?

कला-क्रीडा कोटय़ातील वाढीव गुण, कॉपीचा संभाजीनगर आणि लातूर पॅटर्न आणि १०० टक्के गुण हा योगायोग आहे की काय अशी चर्चा होत आहे. परीक्षेत एकूण ५५० पैकी ५२५ गुण (म्हणजेच ९५.४५ टक्के) मिळाले असल्यास तसेच कोटय़ातील २५ गुणांचा आधार मिळाल्यास १०० टक्के गुणांची लॉटरी लागते.

मुंबईतील ३८ विद्यार्थ्यांचे निकाल रोखले

कॉपी, गैरवर्तन आणि इतर कारणांमुळे राज्यातील ६८८ जणांचे निकाल बोर्डाने राखून ठेवले आहेत. यात मुंबईतील ३८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निकाल राखून ठेवण्यामध्ये पुणे २, अमरावती ५ आणि नाशिकमधील २१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर परीक्षेतून बाद ठरविण्यात आलेल्यांमध्ये पुणे ८५, मुंबई ३६, अमरावती १०३, नाशिक ८२, नागपूर ५७, कोल्हापूर ५८, लातूर ६ आणि कोकणातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.