SSC Result राज्याचा निकाल 94.10 टक्के, कोकणची पोरं हुश्शार; पुन्हा मुलींचाच डंका

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल 94.10 टक्के लागला असून यात मुलांचा निकाल 92.31 टक्के तर मुलींचा निकाल 96.14 टक्के लागल्याने मुलीच पुन्हा सरस ठरल्या. या वर्षी निकालात गतवर्षीच्या तुलनेत 1.71 टक्क्यांची घट झाली आहे. या निकालात कोकण विभाग 98.82 टक्क्यांसह ‘टॉप’वर राहिला असून नागपूर विभाग मात्र 90.78 टक्क्यांसह तळाला राहिला आहे. तर जिह्यांमध्ये सिंधुदुर्ग 99.32 टक्क्यांसह सर्वोत्तम ठरला असून गडचिरोली 82.67 टक्क्यांसह सर्वात कमी निकालाचा जिल्हा ठरला आहे. मुंबई विभागाच्या निकालात पिंचित वाढ झाली असून निकाल 95.84 टक्के लागला आहे. हा निकाल गतवर्षी 95.83 टक्के लागला होता.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 लाख 55 हजार 433 उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी 2024 चा 95.81 टक्के निकाल लागला होता. त्यामुळे यंदा निकालात 1.71 टक्के घट झाली आहे. दरम्यान, ‘अपार’ आयडीमुळे निकाल प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डीजी लॉकरमध्ये सेव्ह करण्यात आला आहे.

– लातूरचा निकाल 92.77 टक्के लागला असून तब्बल 113 विद्यार्थ्यांना शंभरपैकी 100 गुण मिळाले आहेत. लातूर विभागात दहा शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये लातूर आणि नांदेडमधल्या प्रत्येकी चार तर धाराशीव जिह्यातील दोन शाळांचा समावेश आहे.

‘कॉपीमुक्त’ उपक्रमामुळे निकालात घट?

या वर्षी बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातदेखील घसरण झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. राज्याच्या शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचा परिणाम निकालाच्या टक्केवारीतून दिसून आले. दहावीचा निकाल यंदा 14 दिवस लवकर जाहीर झाला. परीक्षा 10 दिवस लवकर सुरू झाली होती.

निकालाची वैशिष्टय़े
– खासगी विद्यार्थ्यांचा निकाल 80.36 टक्के
– दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.27 टक्के
– राज्यातील 7 हजार 924 शाळांचा निकाल 100 टक्के
– राज्यातील 0 टक्के निकाल लागलेल्या शाळा 49.
– 37 केंद्रांवर 93 गैरप्रकार, तर 6 पोलीस तक्रारी.
– एटीकेटीची सुविधा 34 हजार 393 विद्यार्थ्यांना मिळाली.
– सवलत गुणांचा लाभ 2 लाख 46 हजार 602 विद्यार्थ्यांनी घेतला.
– 86 हजार 641 विद्यार्थी पुनर्परीक्षेला अपात्र.

गेल्या चार वर्षांतला निकाल
– मार्च-एप्रिल 2022 – 96.94 टक्के
– मार्च 2023 – 93.83 टक्के
– मार्च 2024 – 95.81 टक्के
– फेब्रुवारी-मार्च 2025 – 94.10 टक्के

विभागनिहाय निकाल
कोकण 98.82 टक्के
कोल्हापूर 96.87 टक्के
मुंबई 95.84 टक्के
पुणे 94.81 टक्के
नाशिक 93.04 टक्के
अमरावती 92.95 टक्के
लातूर 92.77 टक्के
छत्रपती संभाजीनगर 92.82 टक्के
नागपूर 90.78 टक्के

211 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी!
राज्यातील निकालात 211 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के तर 285 विद्यार्थ्यांना 100 पैकी 35 टक्के गुण मिळाले आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

7 हजार 924 शाळांचा निकाल 100 टक्के

14 ते 28 मे पर्यंत ऑनलाइन गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार

24 जून ते 17 जुलै दहावीची पुरवणी परीक्षा

‘सीबीएससी’ दहावी, बारावीच्या निकालात वाढ

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएससी) घेण्यात आलेल्या दहावी-बारावीचा निकालही आज जाहीर झाला असून दहावीचा निकाल 93.66 टक्के लागला आहे. तर केंद्रीय बोर्डाचा बारावीचा निकाल 88.39 टक्के लागला आहे. गतवर्षी हा निकाल 87.98 टक्के इतका लागला होता. निकालात 0.41 टक्के वाढ झाली आहे.