नापास होण्याच्या भीतीने घर सोडून पळालेल्या सुमेधला मिळाले 79 टक्के

दहावीच्या परीक्षेत नापास होईन या भीतीने चार वर्षांपूर्वी घर सोडून पळालेल्या सुमेधचा शोध घेण्यास ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकास दीड वर्षांपूर्वी यश आले होते. त्या सुमितला यंदा दहावीत 79 टक्के गुण मिळाले आहेत. या यशानंतर त्याच्या वडिलांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले आहे.

ठाण्यातील वसंत विहार येथील फुलचंद्र चंद्रा यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात 27 मार्च 2015 रोजी त्यांचा पंधरा वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी या घटनेचा तपास नैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्याकडे सोपवला होता. 22 जानेवारी 2019 रोजी नेरुळ येथे राहत असून त्याने बँक ऑफ इंडिया नेरूळ शाखेत खाते उघडल्याची माहिती मिळाली. त्यावरून दौंडकर आणि त्यांच्या पथकाने बँकेच्या शाखेत जाऊन चौकशी केली असता तो सुमेधच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 30 जानेवारी 2019 रोजी सुमेध कामानिमित्त बँकेत आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्वरित बँकेत जाऊन त्याला ताब्यात घेतला आणि पालकांच्या हवाली केले.

समुपदेशन कामी आले

सुमेधचे समुपदेशन करण्यात आले आणि त्याने पुन्हा दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेस त्याने मन लावून अभ्यास केल्याने त्याला 79.04 टक्के इतके गुण मिळाले आहेत. चार वर्षानंतर परत घरी आलेल्या आपल्या मुलाने मिळवलेल्या यशानंतर सुमित चे वडील फुलचंद्र चंद्र यांनी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर आणि त्यांच्या पथकाचे एक पत्र लिहून आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या