
दहावीच्या जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत नापास झालेल्या रिपिटर्स विद्यार्थ्यांना मार्च 2020 च्या परीक्षेपासून नव्या अभ्यासक्रमाचीच परीक्षा द्यावी लागणार आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेच्या दोन संधी आता संपल्या आहेत.
वर्ष 2018 मध्ये दहावीसाठी पुनर्रचित म्हणजेच नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला. यानंतर मार्च 2019 व जुलै 2019 मध्ये पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत रिपिटर्स विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेच्या दोन संधी देण्यात आल्या होत्या. या परीक्षेनंतरही जुन्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षेत नापास झाले असतील तर त्यांना आता नव्या अभ्यासक्रमानुसारच परीक्षा द्यावी लागणार आहे.
आऊट ऑफ टर्न परीक्षा
वैद्यकीय आणि काही अपरिहार्य कारणामुळे प्रात्यक्षिक परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांची आऊट ऑफ टर्न पद्धतीने 24 व 26 मार्च रोजी परीक्षा होणार आहे.
ठाण्यात सर्वाधिक 1 लाख 27 हजार विद्यार्थी
मुंबई विभागीय शिक्षण मंडळातून परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी हे ठाणे जिह्यात आहेत. मुंबई विभागातून एकूण 3 लाख 91 हजार 991 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. एकूण 1 हजार 24 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. मुंबई दक्षिण 36 हजार 17, मुंबई पश्चिम 69,449, मुंबई उत्तर 54,740, रायगड 40,354 आणि पालघर जिह्यातून 64 हजार 204 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
- परीक्षेला जाण्याआधी हॉलतिकीट घेतले आहे याची खात्री करा.
- शांत झोप घ्या; उजळणीवर लक्ष केंद्रित करा.
- वाहतूक कोंडीचा विचार करता घरातून वेळेत बाहेर पडा.
- काही अडचणी असल्यास बोर्डाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधा.
- पूरक आहार घ्या; तब्येतीविषयी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.
- प्रश्नपत्रिकेचे आकलन होण्यासाठी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी दहा मिनिटे आधी वाचनासाठी प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे.






























































