
सामना प्रतिनिधी । मुंबई
शालांतर्गत तोंडी परीक्षांचे गुण रद्द केल्यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली. विद्यार्थ्यांवर हा अन्याय होऊ नये यासाठी या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांमध्ये शालांतर्गत गुणांचा समावेश करण्यात येणार येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना दिले आहे.
शालांतर्गत गुण रद्द केल्याने एसएससी बोर्डाची घसरलेली टक्केवारी आणि यामुळे त्यांच्या प्रवेशाचा पेच सोडविण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी बुधवारी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांचे शालांतर्गत गुण पुन्हा सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनीही हे गुण यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच सुरू करण्यात येतील असे आश्वासन देतानाच संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱयांना दिले.
माझ्या हातून चांगलं काम व्हावं!
आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार का? मुख्यमंत्री होण्याबाबत आपले मत काय आहे? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले. मात्र या प्रश्नांना तितक्याच हुशारीने उत्तर देत सध्या मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा मला विद्यार्थ्यांच्या गुणांचा तसेच त्यांच्या प्रवेशाविषयी झालेला तिढा सोडविण्यात अधिक रस असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या हातून अधिकाधिक चांगलं काम व्हावं यासाठी प्रयत्न करत राहणं, हेच ध्येय असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त तुकडी
एसएससीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत यासाठी राज्य सरकारने सीबीएसई, आयसीएसई विद्यार्थ्यांचे केवळ लेखी परीक्षांचेच मार्क प्रवेशादरम्यान गृहीत धरण्याचे ठरविले आहे. याविरोधात हे विद्यार्थी न्यायालयात गेल्यास प्रवेश प्रक्रिया रखडून शैक्षणिक वर्षाचे नुकसान होईल. त्यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षासाठी अतिरिक्त तुकडी निर्माण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनीही अशी तुकडी तयार करण्याचे आश्वासन दिले, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
शेतकऱयांना पीक विम्याचे पैसे द्या!
दुष्काळी दौऱयादरम्यान अनेक शेतकऱयांना पीक विम्याचे पैसे न मिळाल्याची बाब निदर्शनास आली. हे पैसे शेतकऱयांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील गोरगरीब महिला तसेच शेतकऱयांना रोजगार हमी योजनेतून कामे मिळावीत अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.


























































