एनबीएसएच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता का नाही? हायकोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

mumbai-highcourt

टीव्ही चॅनेलद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या बातम्यांचे नियमन करण्यासाठी न्यूज ब्रॉडकास्टर्स स्टँडर्ड अथॉरिटी (एनबीएसए)सारख्या खासगी संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता का दिली जात नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला विचारला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मीडिया ट्रायलद्वारे विविध वृत्ते प्रसारित केली जात आहेत. त्यामुळे मीडिया ट्रायलवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करत सामाजिक कार्यकर्ते निलेश नवलखा यांनी याचिका दाखल केली आहे, तर या प्रकरणात पोलिसांची बदनामी होत असल्याने निवृत्त आयपीएस पोलिस अधिकाऱ्य़ांनी व आणखी एका संस्थेने हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष पुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. एनबीएसएच्या वतीने ज्येष्ठ वकील अरविंद दातार आणि अॅड. नीला गोखले यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, एखाद्या चॅनेल विरोधात तक्रार आल्यास संबंधित चॅनेलला एक लाखाचा दंड ठोठावला जातो. त्यावेळी वृत्त वाहिन्या दंड भरून माफी मागतात, मात्र अर्णब यांच्या रिपब्लिक टीव्हीने यापैकी काहीही केलेले नाही. उलट नॅशनल ब्रॉडकास्टर असोसिएशन (एनबीए)मधून बाहेर पडत त्यांनी आपली एक संघटना नॅशनल ब्रॉडकास्टर फेडरेशनची स्थापना केली. हा युक्तिवाद ऐकल्यावर खंडपीठाने केंद्र सरकारला फटकारले. रिपब्लिक चॅनेलने दंड भरण्यास नकार दिला, तर सरकारने या चॅनेलला मोकाट का सोडले? अशा चॅनेलवर माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल हायकोर्टाने विचारला. तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयाला आलेल्या तक्रारी एनबीएसएकडे का पाठवल्या जातात त्याबाबत माहिती देण्याचे सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांना आदेश देत सुनावणी तहकूब केली.

डॉक्टरांवर कारवाई

सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी डॉक्टरांचे उदाहरण दिले. सवलतीच्या दरात डॉक्टरांना पीजी कोर्समध्ये प्रवेश दिला जातो तेव्हा त्यांना अटीनुसार ग्रामीण भागात सेवा करावी लागते. जर ते अट पूर्ण करू शकत नाहीत तर डॉक्टरांना त्यांचे प्रमाणपत्र दिले जात नाही व त्यांनी अट नाकारल्यास भरमसाट दंड आकारला जातो त्याप्रमाणे चॅनेलसाठी असे नियम का नाहीत, अशी विचारणा हायकोर्टाने केंद्र सरकारला केली.

आपली प्रतिक्रिया द्या