एसटीचे आतापर्यंत 563 कर्मचारी बडतर्फ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाचा संप सुरूच असून आज महामंडळाने निलंबित केलेल्या कर्मचाऱयांपैकी 148 कर्मचाऱयांना सेवेतून बडतर्फ केले असून एकूण बडतर्फ केलेल्या कर्मचाऱयांची संख्या आता 563 इतकी झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत महामंडळाचे 23 हजार 660 कर्मचारी डय़ुटीवर हजर झाले असून 109 कर्मचारी आज नव्याने डय़ुटीवर जॉइंट झाले आहेत.

एसटी महामंडळ कर्मचाऱयांचा 27 ऑक्टोबरपासून संप सुरू असून एसटी कर्मचाऱयांना 22 आणि 23 डिसेंबरपर्यंत कामावर परतण्याची संधी देण्यात येऊन त्यांच्यावरील सर्व प्रकारची कारवाई मागे घेण्याची तयारी परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांनी दाखवली होती. त्यानंतर दोन हजार कर्मचारी कामावर परतले आहेत, परंतु अजूनही चालक आणि वाहक मोठय़ा प्रमाणावर गैरहजर असून त्यांचा दोन महिन्यांचा पगारही देण्यात आलेला नाही. त्यातच लातूर व यवतमाळ येथील नऊ कामगारांनी आपल्यावरील बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी स्थानिक कामगार न्यायालयात धाव घेतली होती, परंतु न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार देत महामंडळाच्या बाजूने निकाल दिल्याने बडतर्फी झालेल्या कामगारांचे धाबे दणाणले आहे.