
एसटी प्रवाशांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी सध्या कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाच्या प्रत्येक बसमध्ये, ती बस ज्या आगाराची आहे त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक व त्या विभागप्रमुखाचा दूरध्वनी क्रमांक ठळकपणे प्रदर्शित करण्यात यावा असे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
एसटीने दररोज सुमारे 67 लाख प्रवासी प्रवास करतात. सुरक्षित प्रवासाबरोबरच प्रवाशांना सौजन्यशील सेवा देणे हे एसटी महामंडळाचे प्रमुख ध्येय आहे. एसटीच्या प्रवाशांना प्रवासामध्ये काही समस्या उद्भवल्यास अथवा प्रवासी सेवेबाबत काही सूचना द्यावयाची असल्यास सध्या त्यांना संपर्क करण्यास अडचणी येत आहेत. सेवा क्षेत्रामध्ये काम करीत असताना ग्राहकांचे समाधान हेच अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. ग्राहकाच्या तक्रारी, समस्या आणि सूचनांचे निराकरण त्या त्या पातळीवर तातडीने होणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांनी आपले उत्तरदायित्व ओळखून प्रत्येक प्रवाशाच्या तक्रारी अथवा समस्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.
लवकरच परिपत्रक जारी करणार
प्रवासी सेवांचा दर्जा उंचावणे व अधिकाधिक प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चालक-वाहकांच्या बरोबरच अधिकाऱ्यांनीदेखील प्रवाशांच्या समस्या जाणून त्याचे तातडीने निरसन करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. एसटी बसमध्ये आगार प्रमुख व विभागप्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक प्रदर्शित करण्याबाबतचे परिपत्रक लवकरच एसटी प्रशासनाकडून जारी करण्यात येणार आहे.


























































